ऋजुता लुकतुके
भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील सगळ्यात उत्कंठावर्धक सामना असणारए तो १४ ऑक्टोबरला अहमदाबादला होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना. या सामन्याची तिकीटविक्रीही ऑनलाईनच होणार आहे. अपेक्षेप्रमाणे सामन्याच्या प्री-सेल तिकिट विक्रीला चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.
सुरुवातीला विक्रीसाठी उपलब्ध झालेली तिकिटं हातोहात खपली. मास्टरकार्ड या स्पर्धेचा एक प्रायोजक आहे. त्यामुळे मास्टरकार्ड वापरून तिकिटं खरेदी करणाऱ्यांसाठी मंगळवारी (२९ ऑगस्ट) प्राधान्याने काही तिकिटं खुली करण्यात आली. आणि विक्री सुरू झाल्या झाल्या एका तासाच्या आत ही तिकिटं संपली सुद्धा. आता उर्वरित तिकिटं ३ सप्टेंबरला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होतील. यंदा तिकीट विक्री बुक माय शो वेबसाईटवर ऑनलाईन होत आहे.
(हेही वाचा –Shreyas Iyer Fitness : श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीबद्दल राहुल द्रविड समाधानी )
मास्टरकार्ड प्री-सेलसाठी सामन्याची नेमकी किती तिकिटं उपलब्ध करून दिली होती याची माहिती कळू शकलेली नाही. पण, संध्याकाळी सहा वाजता तिकीट विक्री सुरू झाली. आणि सात वाजण्यापूर्वीच तिकिटं संपलेली होती. बुक माय शो वेबसाईटवर भारत – पाक सामन्याच्या पुढे सोल्ड आऊट असा शिक्का लागला. त्याचवेळी इतर आठ सामन्यांची तिकीट विक्रीही सुरू होती. पण, त्या सामन्यांना इतका प्रतिसाद मिळाला नव्हता.
मास्टर कार्डचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांसाठीच मंगळवारची तिकीट विक्री होती. आणि दुसऱ्या टप्प्यात ३ सप्टेंबरला भारत – पाक सामन्याची उर्वरित तिकिटं खुली करण्यात येतील, असं बीसीसीआय तर्फे सांगण्यात आलं. अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडिअम हे भारतातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम आहे. आणि त्याची आसन क्षमता १,३२,००० इतकी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाहत्यांना स्टेडिअमवर जाऊन भारत – पाक सामन्याचा आनंद घेता येईल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. भारताच्या प्रत्येक सामन्यासाठी तसंच उपान्त्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी एका लॉग-इनवर प्रत्येकी दोन तिकिटं मिळतील. तर इतर संघांच्या सामन्यासाठी प्रत्येकी चार तिकिटं खरेदी करता येतील.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community