ICC World Cup 2023 : चेन्नईत कडक उन्हात रंगणार भारतीय फलंदाज विरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाज अशी लढत

भारतीय क्रिकेट संघ आपली एकदिवसीय विश्वचषकाची मोहीम उद्या रविवारी सुरू करेल ती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने.

123
ICC World Cup 2023 : चेन्नईत कडक उन्हात रंगणार भारतीय फलंदाज विरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाज अशी लढत
ICC World Cup 2023 : चेन्नईत कडक उन्हात रंगणार भारतीय फलंदाज विरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाज अशी लढत
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघ आपली एकदिवसीय विश्वचषकाची मोहीम उद्या रविवारी सुरू करेल ती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने. शुभमन गिल विना खेळणाऱ्या भारतीय संघाचा कस लागेल तो फलंदाजीतच. विश्वचषकाचा कार्यक्रम ठरवताना भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ठेवण्यात आला हा आयोजकांसाठी योगायोगाचा भाग असेल. पण, क्रिकेटचा इतिहास मात्र या निर्णयामुळे गालातल्या गालात हसला असेल. कारण, याच मैदानावर १९८६ आणि २००१ मध्ये याच संघा दरम्यान झालेले कसोटी सामने जगाचं लक्ष वेधून घेणारे ठरले होते.

१९८६ मध्ये झालेला कसोटी सामना दोन्ही देशांमधील पहिला बरोबरीत सुटलेला सामना होता. म्हणजे ही कसोटी टाय झाली. बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशातही जिंकण्याची ताकद नसलेल्या भारतीय संघासाठी तो निकाल रोमहर्षक होता. चौथ्या डावात खेळताना भारताने तेव्हा ३४७ धावांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर २००१ च्या कसोटी मालिकेत भारताने विजय साकारला. पण, तो ही रोमहर्षक स्थितीत. विजयासाठी १५५ धावांची गरज असताना भारताने जेमतेम २ गडी राखून आणि शेवटच्या काही षटकांमध्ये विजय साध्य केला. आणि ती मालिका जिंकली. चेन्नई हे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचं लाडकं मैदान. आणि २००१ च्या कसोटीतही त्याने शतक झळकावलं होतं. इतिहासातून आता थोडं वास्तवात येऊया. अशा या ऐतिहासिक चिदंबरम स्टेडिअमवर रविवारी दुपारी पुन्हा एकदा भारत व ऑस्ट्रेलियाचे संघ आमने सामने येतील. यावेळी फरक हा असेल की, सामना दिवस-रात्र आणि त्यामुळे पांढऱ्या चेंडूनी खेळला जाईल. आणि सामना ५० षटकांचा असेल. या सामन्याचा निकाल ठरवू शकेल अशा पाच गोष्टी बघूया… (ICC World Cup 2023)

चेन्नईचा उकाडा कोण सहन करेल?

मूळातच हा सामना म्हणजे भारतीय फलंदाज वि. ऑस्ट्रेलियन गोलंदाज यांच्यातली लढत असेल. भारतीय फलंदाजांची फळी जगातील सर्वोत्तम फळींपैकी एक आहे. शुभमन गिल रविवारी खेळण्याची शक्यता मावळलेली आहे. पण, त्याची जागा घ्यायला ईशान किशन किंवा सुर्यकुमार यादव समर्थ आहेत. रोहीत शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार, हार्दिक पांड्या, रवी जाडेजा आणि गरज पडल्यास अश्विन असे एकसो एक फलंदाज भारतीय संघात आहेत. सामन्यापूर्वीच्या नेट्समध्ये संघाने फलंदाजीचा कसून सरावही केलाय.

आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडे आहे तेज तोफखाना. कर्णधार पॅट कमिन्ससह हेजलवूड, कॅमेरुन ग्रीन, मिशेल स्टार्क असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि ताशी १४० किमीच्या वेगाने ते चेंडू टाकू शकतात. भारतीय फलंदाजांसाठी संघाची रणनिती ठरलेली आहे, असा विश्वासही कर्णधार पॅट कमिन्सने व्यक्त केला आहे.

पण, आणखी एका गोष्टीची तयारी ऑस्ट्रेलियाने केलीय की नाही, हे रविवारीच कळेल. ती म्हणजे चेन्नईचा उकाडा. इथं ऑक्टोबर महिन्यात तीव्र उन्हाळा असतो आणि हे वर्षही वेगळं नाहीए. घाम गाळणारा, थकवणारा उकाडा ऑस्ट्रेलियन संघ सहन करू शकला तर त्यांना विजयाची शक्यता आहे. दिवसाचं तापमान ३६ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं आणि आर्द्रताही ७७ टक्क्यांच्या जवळपास असणार आहे. अशा वातावरणात खेळणं सोपं असणार नाही. (ICC World Cup 2023)

चेन्नईची खेळपट्टी

चेन्नईच्या खेळपट्टीचं जे स्वरूप इथल्या नेट्समध्ये दिसलं ते अपेक्षेप्रमाणे आहे. खेळपट्टीवर खूपच कमी हिरवेपणा म्हणजे गवत आहे. खेळपट्टी फिरकीला साथ देणार हे नक्की. आणि डावखुऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अश्विनचा ऑफस्पिन त्रास देणार हे ही नक्की. भारतीय संघ जर तीन फिरकी गोलंदाज घेऊन खेळला, तर ऑस्ट्रेलियासमोर फिरकीला सामोरं जाण्याचंच महत्त्वाचं आव्हान असेल.

सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, ‘आमच्याकडे भारतीय फलंदाजांना कशी गोलंदाजी करायची आणि भारतीय गोलंदाजांसमोर कशी फलंदाजी करायची याची रणनीती तयार आहे. रविवारी ती मैदानात प्रत्यक्षात आणणं हे आता करायचंय.’

ऑस्ट्रेलियन संघ हा जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे. त्यामुळे ही लढत कुणासाठीही सोपी असणार नाही. विजेत्याविषयी भाकीत करणं उलट कठीणच. पण, खेळपट्टीचा अचूक अंदाज घेणारा कर्णधार विजयी होईल, एवढं नक्की म्हणता येईल. कारण, चेन्नईची खेळपट्ची नेहमीच वेगळे रंग दाखवत आली आहे. (ICC World Cup 2023)

रोहीतला कुठे लक्ष द्यायचं आहे?

कर्णधार म्हणून रोहीत शर्मासमोर तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील. ड्रेसिंग रुममध्ये चांगलं वातावरण ठेवणारा कर्णधार असा त्याचा लौकीक आहे आणि खेळाडूंशी मिसळून वागणारा असा त्याचा स्वभाव आहे. अशा रोहीतला शुभमन गिलच्या अनुपस्थितीत रविवारी फलंदाजीची सुरुवात करताना मोठी जबाबदारी उचलायची आहे. शुभमन यावर्षी भारताचा सगळ्यात यशस्वी फलंदाज राहिला आहे. १,२५० च्या वर धावा त्याच्या नावावर आहेत. आता रोहीतला सलामीला येताना फलंदाजीची धुरा आघाडीवर राहून पेलायची आहे.

दुसरं म्हणजे ईशान किशन आणि सुर्यकुमार यादव असे दोन पर्याय त्याच्याकडे आहेत. यात कुठला पर्याय कुठल्या खेळपट्चीवर चांगला याचा धोरणात्मक निर्णयही रोहीतला घ्यायचा आहे. सुर्यकुमारने मैदानावर ३६० अंशात मनासारखे षटकार ठोकून टी-२० प्रकारात नाव कमावलं आहे. पण, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सरळ बॅटने खेळताना तो कमी प्रभावी वाटतो. आता रोहीतला सुर्यकुमार आणि पारंपरिक फटके खेळणारा श्रेयस अय्यर या दोन मुंबईकर फलंदाजांना चांगला खेळ करण्यासाठी प्रोत्साहन देणं ही रोहीतची जबाबदारी आहे.

तर गोलंदाजांमध्ये अश्विनचा वापर तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून कधी करायचा आणि विकेट घेण्यात वाकबगार शार्दूल ठाकूरला कधी वापरायचं हे रोहीतला ठरवावं लागेल. संघाची अचूक बांधणी आणि निवड याचा दूरागामी परिणाम भारतीय संघाच्या विश्वचषकातील वाटचालीवरही होणार आहे. (ICC World Cup 2023)

(हेही वाचा – Worli 141 Tenements : वरळीतील १४१ टेनामेंट्सचा वनवास संपला)

अनेक भारतीय खेळाडूंसाठी कदाचित अखेरचा विश्वचषक

एकदिवसीय क्रिकेट पाहायला हल्ली पूर्वीसारखी गर्दी होत नाही. टी-२० क्रिकेटने ५० षटकांच्या क्रिकेटला मागे टाकलंय. पण, एकदिवसीय विश्वचषकाची मोहिनी अजूनही आहेच. भारतीय संघात स्वत: रोहीत धरून विराट, अश्विन, महम्मद शामी, रवी जाडेजा असे अनेक खेळाडू वयाची तिशी ओलांडलेले आहेत. विराट निदान तंदुरुस्तीच्या जोरावर आणखी ४ वर्षं खेळू शकेल. पण, इतर खेळाडूंसाठी कदाचित हा शेवटचा विश्वचषक सामना असेल. यापैकी विराट, रोहीत आणि अश्विन यांनी विश्वचषक विजयाची चव चाखलीय. बाकीच्यांना ती संधी मिळालेली नाही.

रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली सुरुवात झाली तर या खेळाडूंना स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी बळच मिळेल. आणि हे ज्येष्ट खेळाडू चेन्नईत कशी कामगिरी करतात यावर भारतीय विजय अवलंबून असेल. (ICC World Cup 2023)

चिदंबरम वरील कामगिरी

सुरुवातीलाच चिदंबरम स्टेडिअमवरील इतिहासाचा उल्लेख झाला आहे. आणि या स्टेडिअमवरील या दोन्ही संघांची कामगिरी पाहिली तर ऑस्ट्रेलियन संघाचा जोश नक्कीच वाढेल. या मैदानावर यापूर्वी खेळलेल्या १४ एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने ७ जिंकल्या आहेत. आणि ६ गमावल्या आहेत. तर एक सामना रद्द झाला होता. याउलट ऑस्ट्रेलियाने ६ पैकी ५ लढती जिंकल्या आहेत. सहावा सामना जिंकण्याच्या इराद्यानेच आता ते मैदानात उतरतील. तर भारताला यशाची टक्केवारी वाढवायची असेल. (ICC World Cup 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.