ICC ODI World Cup : भारतीय संघात उणीव चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची – रोहीत शर्मा

भारतीय संघाने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक २०११ साली जिंकला होता

162
Rohit Sharma : रोहित शर्मा आयपॅड कुठेही विसरतो. पण, ‘ही’ गोष्ट सामन्यापूर्वी विसरत नाही!
Rohit Sharma : रोहित शर्मा आयपॅड कुठेही विसरतो. पण, ‘ही’ गोष्ट सामन्यापूर्वी विसरत नाही!
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जवळ आलेला असताना भारतीय कर्णधार रोहीत शर्माला चिंता आहे ती संघातील चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची. २०१९ च्या इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातही संघाला हीच उणीव भासली होती, असं रोहीतने एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक शेवटचा जिंकला होता तो २०११ साली. भारतातच झालेल्या या विश्वचषकात महेंद्र सिंग धोनीने शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार अजूनही सगळ्यांच्या लक्षात असेल. सध्याचा कर्णधार रोहीत शर्माला मधल्या १२ वर्षांचं अपयश सलतंय.

‘भारताने शेवटची आयसीसी स्पर्धा किंवा विश्वचषक जिंकला, या गोष्टीला आता बारा वर्षं होऊन गेली. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा तशी कामगिरी करताना बघायचंय,’ असं रोहीत शर्मा मुंबईत ला लिगाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना म्हणाला. पुढे तो असंही म्हणाला की, ‘त्याला छोटे-मोठे विजय नाही तर चॅम्पियनशिप जिंकलेली आवडते.’ त्याचा रोख अर्थातच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाकडे होता. पण, सकारात्मक बोलत असतानाच रोहीतने संघातल्या एका कच्च्या दुव्याबद्दल चिंता व्यक्त केलीच. भारताकडे चौथ्या क्रमांकावर खेळू शकेल असा फलंदाज नाही. युवराज सिंग नंतर तसा खेळाडू भारताला मिळाला नाही, असं त्याने कार्यक्रमानंतर पीटीआयच्या पत्रकाराशी बोलताना सांगितलं. अशाच खेळाडूची मागचे काही वर्षं आपल्याला उणीव जाणवली आहे, असंही त्याने स्पष्ट केलं.

युवराज सिंगसाठी २०११ चा विश्वचषक स्वप्नवत गेला होता. आणि उपान्त्य तसंच अंतिम सामन्यातही तो सामनावीर ठरला होता. तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान त्याने पटकावला होता. डावखुरा फलंदाज असणं ही युवराजची आणखी नैसर्गिक जमेची बाजू होती. कारण, संघात उजव्या आणि डावखुऱ्या खेळाडूंचं संतुलन असेल तर गोलंदाजांसाठी ते कठीण जातं. सध्याच्या संघात ईशान किशन आणि रवींद्र जडेजा सोडले तर डावखुरे फलंदाजही नाहीत.

(हेही वाचा – ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामधील भोंगळ कारभार; उपचार न मिळाल्याने एका दिवसांत पाच रुग्णांचा मृत्यू)

मधल्या फळीतील अपयश विंडिजमध्येही दिसलं 

कर्णधार रोहीत शर्मा म्हणतो त्याप्रमाणे मधल्या फळीत सुधारणेला वाव आहे. विंडिज दौऱ्यातही संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा हे फलंदाज मधल्या फळीत खेळले. तर तिलक वर्माने टी-२० मालिकेत पदार्पण केलं. पण, यापैकी एकही फलंदाज आपली चमक दाखवू शकला नाही. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा संघात जम बसलेले आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. बाकीचे आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात कमी पडले. टी-२० स्पर्धेत तिलक वर्माने पदार्पण केलं. आणि दोन सामन्यात चांगला खेळ केला. पण, इतक्यात त्याला एकदिवसीय संघात नियमित स्थान मिळेल का हे सांगता येत नाही.

दुसरीकडे, के एल राहुल आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू दुखापतींशी झगडतायत. श्रेयस अय्यरने यापूर्वी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केलेली आहे. २० सामन्यांत त्याने ४७ धावांच्या सरासरीने ८०५ धावा या क्रमांकावर केल्या आहेत. पण, तो मोठ्या कालावधीसाठी दुखापतीमुळे बाहेर आहे. एकंदरीत आशिया चषक आणि पुढील विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होईल तेव्हा भारतीय संघातील फलंदाजांची फळी कशी असते यावर सगळ्यांचं लक्ष असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.