क्रिकेटच्या काही नियमांत बदल होण्याची शक्यता आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लबने क्रिकेटच्या काही नियमांमध्ये दुरुस्तीच्या सूचना केल्या आहेत. या नियमांत मांकडिंगपर्यंतच्या नियमांबाबतही बदल सूचवण्यात आले आहेत. 1 ऑक्टोबरपासून हे नियम लागू होण्याची शक्यता आहे.
या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता
- कोरोना व्हायरसमुळे चेंडूला लाळ लावण्यास मज्जाव करण्यात आला होता. आता हा नियम कायम करण्यात आला आहे. चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली असून केवळ घामाचाच वापर करता येईल.
- एखादा खेळाडू झेल बाद झाल्यानंतर मैदानात येणारा नवा खेळाडूच स्ट्राईक घेणार. याआधी नियम होता की जर फलंदाज झेलच्या दरम्यान एंड बदलत असेल तर जुना फलंदाजही बॅटिंग करु शकत होता.
- मांकडिंगला अधिकृतरित्या धावचीत समजलं जाईल. गोलंदाजाने चेंडू फेकण्याआधी नॉन स्ट्रायकिंग एन्डचा फलंदाज क्रीजमधून बाहेर गेल्यास गोलंदाज थांबून तिथल्या स्टम्पच्या बेल्स उडवतो त्याला मांकडिंग म्हटलं जातं. याआधी याला अनफेअर प्लेचा दर्जा होता.
- वाईड बॉलबाबतही आता बदल झाले आहे. एखादा खेळाडू इनोव्हेटिव शॉट खेळण्यासाठी आपल्या स्टान्समध्ये बदल करतो आणि त्यामुळे गोलंदाज चेंडू आजूबाजूला फेकतो. अशा परिस्थितीत फलंदाजाच्या पोझिशननुसारच वाईड बॉल ठरवला जाईल, स्टम्पच्या अंतरावरुन नाही.
( हेही वाचा: कनालवरील धाडीने खुश होणारा सेनेचा ‘तो’ नेता कोण? राजकीय वर्तुळात चर्चा! )
- जर चेंडू पिचपासून दूर पडला आणि फलंदाजाने तो शॉट खेळला तर त्याचा किंवा त्याच्या बॅटचा काही भाग पिचवर असणं गरजेचं आहे. जर असं झालं नाही तर तो बॉल डेड घोषित करण्याचा अधिकार पंचांकडे असेल. याशिवाय एखादा चेंडू फलंदाजाला पिचमधून बाहेर येण्यास भाग पाडत असेल तर तो नो बॉल असेल.
- क्षेत्ररक्षक जर नियमांच्या बाहेर जावून हालचाल करत असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 पेनल्टी धावा मिळतील. याआधी हा डेड बॉल घोषित केला जात होता.
- मैदानात कोणत्याही व्यक्ती, प्राणी किंवा अन्य वस्तूला कोणत्याही टीमकडून नुकसान झालं तर तो डेड बॉल ठरवला जाईल. पहिल्यांदा असं झाल्यास खेळ सुरुच राहायचा किंवा काही वेळासाठी थांबवण्यात येत होता.
- ज्या खेळाडूला बदली केलं आहे, त्याच्या जागी येणाऱ्या खेळाडूला तेच नियम लागू असतील. खेळाडूवर बंदी घालणे आणि विकेट घेणे यासारख्या परिस्थितीत देखील नियम लागू होईल.