आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना आगामी स्पर्धेसाठी मिळाली संधी

मागील आठवड्यात देशातील ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू दिल्लीत जंतर मंतर मैदानात आंदोलनाला बसले होते. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याकडून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप लावत त्यांचा अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली, तसेच पुढील स्पर्धेसाठी आंदोलकर्त्या कुस्तीपटूंची निवडही केली.

१ ते ५ फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या झाग्रेब ओपन ग्रांप्रीमध्ये बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यासह ५५ सदस्य असलेल्या भारतीय कुस्ती पथकाला केंद्राने परवानगी दिली आहे. नव्याने नियुक्त केलेल्या देखरेख समितीने क्रमवारीतील या पहिल्या स्पर्धेसाठी १२ महिला, ११ ग्रीको-रोमन आणि १३ पुरुष फ्रीस्टाइल कुस्तीपटूंची निवड केली आहे. या संघात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते रवी कुमार दहिया, अंशू मलिक आणि दीपक पुनिया यांचाही समावेश आहे. या दौऱ्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या बालेकिल्लात आव्हानाची भाषा; म्हणाले….)

महासंघाची जबाबदारी समितीवर 

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने या आठवड्याच्या सुरुवातीला पाच सदस्यीय देखरेख समिती स्थापन केली होती. या समितीकडे महासंघाचे दैनंदिन काम पाहण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनुभवी बॉक्सर एमसी मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये माजी कुस्तीपटू योगेश्वर दत्त, माजी बॅडमिंटनपटू आणि मिशन ऑलिम्पिक सेल सदस्य तृप्ती मुरगुंडे, माजी टॉप्स सीईओ राजगोपालन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) माजी कार्यकारी संचालक (क्रीडा) राधिका श्रीमन यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here