-
ऋजुता लुकतुके
हे महत्त्वाचं ऑलिम्पिक वर्षं आहे. अशावेळी भारतीय कुस्ती फेडरेशनमधील वाद लवकर मिटून कुस्तीपटूंचं नुकसान होऊ नये अशी इच्छा युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष नेनाद लालोविक यांनी बोलून दाखवली आहे. पण, त्यासाठी कुस्ती आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील सगळे अधिकारी आणि संस्था यांच्यात एकवाक्यता दिसली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.
म्हणजेच कुस्ती फेडरेशनची कार्यकारिणी आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांनी एकत्र येऊन कुस्तीतील वादावर वेळेवर तोडगा काढणं आवश्यक आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागाच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय संघटनेनं कुस्तीचा कारभार हाकणाऱ्या ऑलिम्पिक असोसिएशन नियुक्त तात्पुरत्या समितीला पत्र लिहून तसं कळवलं आहे. आपण कुस्ती फेडरेशनला मान्यता द्यायला तयार आहोत. पण, सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावर निर्णय घ्यावा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. म्हणजेच कुस्ती फेडरेशनच्या कार्याकारिणीला ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आवश्यक असेल.
(हेही वाचा – Yashasvi Jaiswal : दक्षिण आफ्रिका मालिकेतून यशस्वी जयसवाल काय शिकला?)
कुस्तीतील मागचं अख्खं वर्षं हे बजरंग पुनिया,(Bajrang Punia) साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांच्यासह अनेक खेळाडूंनी माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण (Brijbhushan Sharan) यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनात गेलं. त्यामुळे अंतिम पनघल ही एकमेव महिला खेळाडू सध्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. बाकीच्या अनेकांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धड सहभागीच होता आलेलं नाही. किंवा शिबिरातही सराव करता आलेला नाही. त्यामुळे आधीच कुस्तीपटूंचं नुकसान झालंय. त्यातच आता कुस्ती फेडरेशनलाच मान्यता नसल्यामुळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले खेळाडूही भारतीय ध्वजाखाली खेळू शकणार नाहीएत.
ही परिस्थिती टाळायची असेल तर देशातील सर्व क्रीडा प्रशासक यंत्रणा आणि कुस्ती फेडरेशन यांनी एकत्र यावं असं आवाहनच जागतिक संघटनेनं केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community