भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी ‘या’ दिग्गजांची नावे चर्चेत

या पदासाठी अनेक दिग्गज खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू कर्णधार विराट कोहलीने टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्याची घोषणा केल्यानंतर ती जागा कोण पटकावणार, याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यातच आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार, याचीही चर्चा सुरू आहे. या पदासाठी अनेक दिग्गज खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.

ही नावे आघाडीवर

रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. टी-20 विश्वचषकानंतर शास्त्री प्रशिक्षकपदाला रामराम करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे या पदासाठी अनेक दिग्गज खेळाडूंची नावे शर्यतीत आहेत. यामध्ये भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याचे नाव आघाडीवर आहे. 2016 साली कुंबळेने प्रशिक्षक पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. पण कोहली आणि त्याच्यात काही मतभेद झाल्याने कुंबळे पायउतार झाला होता. कुंबळेसोबतच विख्यात माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव देखील या पदासाठी चर्चेत आहे. आयपीएलमध्ये लक्ष्मण सनरायजर्स हैद्राबाद संघाचा मेन्टॉर आहे.

(हेही वाचाः विराटने दिला चाहत्यांना धक्का! सोडणार कर्णधारपद)

एकमेव माजी परदेशी खेळाडूचे नाव 

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतो, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने सुद्धा या पदासाठी प्रमुख दावेदार म्हणून ओळखला जात आहे. जयवर्धने या एकमेव भारताबाहेरील खेळाडूचे नाव या पदासाठी मोठ्या चर्चेत आहे. जयवर्धने सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here