भारताची सुवर्ण कामगिरी, 73 वर्षांत पहिल्यांदाच रचला इतिहास

110

थॉमस चषक स्पर्धेत भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी उल्लेखनीय अशी कामगिरी करत इतिहास रचला आहे. थॉमस चषक स्पर्धेच्या गेल्या 73 वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावत भारताची मान उंचावली आहे. या चषकातील पहिलेच पदक सुवर्णपदक मिळवल्यामुळे ही एक ऐतिहासिक कामगिरी असल्याचे क्रीडा विश्वात बोलले जात आहे.

ऐतिहासिक विजय

बॅडमिंटन खेळ प्रकारात मानाची समजल्या जाणा-या थॉमस चषक स्पर्धेत भारतीय संघाने बलाढ्य अशा इंडोनेशियावर विजय मिलत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे. इंडोनेशियाने आजवर 14 वेळा या चषकावर आपली मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेत सुरुवातीपासूनच भारताने आपला दरारा कायम ठेवला होता. उपांत्य फेरीत भारताने डेन्मार्कवर 3-2 ने मात करत अंतिम फेरीत धडक दिली होती.

(हेही वाचाः पालघरमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचा मंडप कोसळला)

सुवर्ण कामगिरी

त्याआधी भारताने मलेशियाचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान पटकावले होते. त्यामुळे भारताचे कांस्यपदक निश्चित झाले होते. पण लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टी, किदम्बी श्रीकांत, एम आर अर्जुन, ध्रुव कपिला आणि एचएस प्रणॉय यांच्या लक्षवेधी कामगिरीने भारतीय बॅडमिंटन संघाने थेट सुवर्ण पदकावर आपली मोहोर उमटवली आहे.

चुरषीचा सामना

पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने कडवी झुंज देत इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंटींगवर 8-21, 21-17,21-16 असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये चांगली कामगिरी न करता आलेल्या लक्ष्यने पुढच्या दोन्ही गेममध्ये विजय मिळवला. त्यामुळे त्याने भारताला अंतिम सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुहेरीत सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टी यांनी 0-1 अशा पिछाडीवरुन मुसंडी मारत 3-1 अशी कामगिरी केली. तर किदम्बी श्रीकांतने अखेरच्या एकेरीमध्ये 21-13, 23-21 अशा सलग सेटमध्ये विजय मिळवत सुवर्ण कामगिरी केली.

(हेही वाचाः तुम्ही वाहन चालवताना हेल्मेट वापरताय ना? नाहीतर…)

मोदींनी केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारताच्या या कामगिरीसाठी खेळाडूंचे कौतुक केले आहे. हा विजय भविष्यातील अनेक खेळाडूंना प्रेरित करणारा आहे, असे मोदींनी म्हटले आहे. पुढील वाटचालासाठी सर्व खेळाडूंना मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.