Vijay Hazare ODI Trophy : विजय हजारे चषकाच्या उपान्त्य फेरीत तामिळनाडू विरुद्ध हरयाणा तर कर्नाटक विरुद्ध राजस्थान

विजय हजारे या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत उपान्त्य फेरीचे चार संघ निश्चित झाले आहेत

210
Vijay Hazare ODI Trophy : विजय हजारे चषकाच्या उपान्त्य फेरीत तामिळनाडू विरुद्ध हरयाणा तर कर्नाटक विरुद्ध राजस्थान
Vijay Hazare ODI Trophy : विजय हजारे चषकाच्या उपान्त्य फेरीत तामिळनाडू विरुद्ध हरयाणा तर कर्नाटक विरुद्ध राजस्थान

ऋजुता लुकतुके

विजय हजारे एकदिवसीय चषक स्पर्धेत मुंबई आणि बंगाल या बलाढ्य संघाचं आव्हान उपउपान्त्य फेरीत संपुष्टात आलं आहे. आणि या दोन संघांना हरवून अनुक्रमे तामिळनाडू आणि हरयाणा (Vijay Hazare ODI Trophy) हे संघ उपान्त्य फेरीत पोहोचले आहेत. आता याच दोन संघांची पुढील फेरीत गाठ पडेल. तर दुसरा उपान्त्य सामना कर्नाटक आणि राजस्थान या संघांदरम्यान होईल.

तामिळनाडूने मुंबईचा पराभव केला तो सात गडी आणि सात षटकं राखून. मुंबईने पहिली फलंदाजी करताना २२७ धावा केल्या. स्पर्धेत सलग तिसऱ्या सामन्यात मुंबईची फलंदाजी कमजोर ठरली. प्रसाद पवारच्या ५९ आणि शिवम दुबेच्या ४५ धावांमुळे मुंबईचा संघ निदान दोनशेचा पल्ला गाठू शकला. बाकी कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी टरला. तामिळनाडूकडून वरुण चक्रवर्तीने तीन तर साई किशोरनेही तीन बळी मिळवले. २२८ या लक्ष्याचा पाठलाग करताना अनुभवी तामिळ फलंदाज बाबा इंद्रजीतने नाबाद १०३ धावा केल्या.

विजय शंकरने ५१ धावा करत त्याला चांगली साथ दिली. तर बाबा अपराजितने ४५ धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने मुंबईचा सात गडी राखून पराभव केला. ४४व्या षटकांतच त्यांनी विजय साकार केला.

उपउपान्त्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात हरयाणाने बंगालचा चार गडी राखून पराभव केला. इथं बंगालने पहिली फलंदाजी करताना २२५ धावा केल्या त्या शाहबाझ अहमदच्या शंभर धावांच्या जोरावर. बाकी फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. हरयाणातर्फे यजुवेंद्र चहलने ४ गडी बाद केले तर राहुल टेवाटियाने २ गडी बाद केले. याला उत्तर देताना हरयाणाच्या अंकित कुमारने १०२ धावा केल्या. आणि हरयाणाने विजय साकारला. यजुवेंद्र चहल आता भारतीय ए संघाकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघणार आहे. त्यापूर्वी त्याने आपला फॉर्म दाखवून दिला आहे.

राजस्थान आणि केरळ दरम्यानचा सामना कमालीचा एकतर्फी झाला. राजस्थानने पहिली फलंदाजी करताना २६७ धावा केल्या. महिपाल लोमरोरने १२२ धावा केल्या तर कुणाल सिंगने ६६ धावा करून राजस्थानच्या डावाला आकार दिला. त्यानंतर केरळचा संघ मात्र ६७ धावांतच गुंडाळला गेला. त्यांचा एक फलंदाज दुखापतीमुळे मैदानावर (Vijay Hazare ODI Trophy) येऊ शकला नाही. उर्वरित ९ गडी त्यांनी ६७ धावांत गमावले. अनिकेत चौधरीने ४ तर अराफत खानने ३ बळी मिळवले. राजस्थानने २०० धावांनी विजय साकारला.

उपउपान्त्य फेरीच्या चौथ्या सामन्यात कर्नाटकने विदर्भाचा सात गडी राखून पराभव केला. विजय हजारे चषकाचे उपान्त्य फेरीचे सामने १३ आणि १४ डिसेंबरला राजकोट इथं होणार आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.