Vinesh Phogat : विनेश फोगाटची अमृतसर इथं सुवर्ण मंदिराला भेट

Vinesh Phogat : विनेश हरयाणा निवडणुकीत उभी राहणार असल्याची चर्चा रंगली आहे 

135
Vinesh Phogat : विनेश फोगाटची अमृतसर इथं सुवर्ण मंदिराला भेट
Vinesh Phogat : विनेश फोगाटची अमृतसर इथं सुवर्ण मंदिराला भेट
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचूनही १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे स्पर्धेतून बाद झालेली विनेश फोगाट (Vinesh Phogat) शनिवारी अमृतसर इथं सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तिथे वाहे गुरूंकडे तिने शक्ती आणि ताकदीचा आशीर्वाद मागितला. ‘मला इथं येऊन खूपच छान वाटतंय. माझ्यात सकारात्मक ऊर्जा पसरली आहे. मी वाहेगुरूंकडे ताकदीचं वरदान मागितलं,’ असं विनेशने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. हा ऑगस्ट महिना विनेशसाठी संघर्षाचा गेला आहे. आधी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला स्पर्धेतून बाद व्हावं लागलं. त्यानंतर क्रीडा लवादानेही तिचं अपील फेटाळलं. भारतात परत आल्यावर मात्र हरयाणात तिचं जल्लोषात स्वागत झालं आहे. इतकंच नाही तर आगामी हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीतही विनेशला उमेदवारी देण्याचा काही पक्षांचा विचार सुरू आहे. अशावेळी विनेशने सुवर्ण मंदिराला भेट देण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

(हेही वाचा- Ration Card वर मिळणारा मोफत तांदूळ आता बंद! ‘या’ ९ गोष्टी मिळणार)

७ ऑगस्टला विनेशचं ऑलिम्पिक पदक हुकलं. त्यानंतर तिने लगेचच आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. पुढे क्रीडा लवादामध्ये संयुक्त रौप्य पदकासाठी तिने केलेलं अपील फेटाळल्यावर १७ ऑगस्टला ती भारतात परतली. आणि तेव्हा तिचं झालेलं स्वागत बघून ती भारावून गेली होती. नवी दिल्लीपासून तिचं गाव भिवानीला पोहोचेपर्यंत विनेशची मिरवणूक काढण्यात आली. विजेत्याला देण्यात येणारी सुवर्ण गदाही तिला तिच्या गावातील सरपंचांनी प्रदान केली. या स्वागत आणि पाठिंब्यामुळे आपल्याला हुरुप आल्याचं तेव्हा विनेशने म्हटलं होतं. (Vinesh Phogat)

 निवृत्तीवरही ती पुनर्विचार करत असल्याचं एका प्रसिद्धी पत्रकावरून त्यावेळी वाटलं होतं. ‘जर परिस्थिती बदलली, तर मी अगदी २०३२ पर्यंतही खेळू शकते. कारण, कुस्तीवरील माझं प्रेम कमी होणारं नाही. आणि माझ्यातील कुस्तीही संपणार नाही,’ असं या पत्रकात तिने म्हटलं होतं. पण, त्याचवेळी आगामी हरयाणा निवडणुकीत तिला उतरवण्याचा प्रयत्न खाप पंचायतीतील नेते करत असल्याची बातमी आली. त्यामुळे येणाऱ्या काळात विनेश नक्की काय करते हे अजून स्पष्ट झालेलं नाही. चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे. (Vinesh Phogat)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.