- ऋजुता लुकतुके
गौतम गंभीरची नियुक्ती होण्यापूर्वी एका गोष्टीची चर्चा वारंवार आणि ती ही गंभीरच्या विरोधात होत होती, ती म्हणजे विराट कोहलीशी त्याचे ताणले गेलेले संबंध. पण, आता क्रिकबझमधील एका बातमीनुसार, विराटने बीसीसीआयला दोघांत समेट झाल्याचं कळवलं आहे. ‘झालेलं प्रकरण मागे सोडून द्यायला आपण तयार आहोत,’ असं विराटने म्हटल्याचं या बातमीत म्हटलं आहे. विराट सध्या आपल्या कुटुंबीयांसह लंडनमध्ये आहे. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो खेळणार आहे. (Virat Kohli)
आधी तो आणि रोहित शर्मा असे दोघेही एकदिवसीय मालिकेदरम्यान विश्रांती घेतील असं बोललं जात होतं. कोहली आणि गंभीर यांच्यात गेल्यावर्षी आयपीएल दरम्यान अनेक वेळा शाब्दिक चकमक घडली. लखनौ आणि बंगळुरू या सामन्यानंतर मैदानातच इतकं मोठं भांडण झालं की, आयपीएल प्रशासनाला मध्ये पडावं लागलं. त्यांनी दोघांनाही सामन्याच्या मानधनातील ८० टक्के रक्कम कापण्याची शिक्षा केली होती. (Virat Kohli)
(हेही वाचा – Vadodara: विद्यार्थी जेवत असतानाच शाळेची भिंत कोसळली; घटना सीसीटीव्हीत कैद)
‘यापूर्वी झालेल्या भांडणाचे पडसाद ड्रेसिंग रुममध्ये पडू देणार नाही आणि आधीच्या गोष्टी मनात ठेवून वागणार नाही,’ असं विराट कोहलीने संबंधित बीसीसीआय पदाधिकाऱ्याला स्पष्टपणे सांगितल्याचं क्रिकबझने म्हटलं आहे. विराट आणि बीसीसीआयमधील ही चर्चा टी२० विश्वचषकानंतर लगेच झाली आहे. (Virat Kohli)
विराट आणि गौतम गंभीर हे दोघंही विजयासाठी खेळणारे खेळाडू आहेत. दोघांची आक्रमकता हा त्यांचा समान गुण आहे. पण, आयपीएलमध्ये ते प्रतिस्पर्धी संघांसाठी खेळत होते. आता ते एकाच संघासाठी खेळणार आहेत, दोघं मानसिकदृष्ट्या तयार असतील तर संघाला दोघांचा उपयोगच होईल, असं बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनीही क्रिकबझला सांगितलं आहे. यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचंही काही काळ जमत नव्हतं. पण, रोहित कर्णधार होण्यापूर्वी दोघांनी जमवून घेतलं. आता गंभीर आणि विराट यांची एकत्र परीक्षा श्रीलंका दौऱ्यावर पहिल्यांदा होणार आहे. (Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community