भारतीय क्रिकेट संघातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये त्याचीच चर्चा सुरू असून, विशेषत: कोहलीच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर हा मुद्दा अधिकच तापला आहे. कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे सुरू झालेला वाद कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर आणखी वाढला. कोहलीने बुधवार 15 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत यापूर्वी माहिती देण्यात आली नव्हती. यासोबतच कोहलीने म्हटले होते की, बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दावा केल्याप्रमाणे टी-20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेताना त्याला कोणीही रोखले नव्हेत वा कोणत्याही प्रकारचा सल्ला देण्यात आला नव्हता. आता भारताचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांनी या प्रकरणावर आपले मत मांडले आहे.
खेळाडूंनी तशी अपेक्षा करु नये
भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे महान कर्णधार कपिल देव यांनी एका खासगी हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, बीसीसीआयने आपला निर्णय कोणाला सांगायचा की नाही ही त्यांची मर्जी आहे. निवडकर्त्यांनी विराट कोहलीइतके क्रिकेट खेळले नसेल, पण कर्णधारपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांना कुणालाही काहीही सांगण्याची गरज नाही, अगदी विराटलाही नाही. खेळाडूंनी त्याची अपेक्षा करू नये,असं कपील देव यावेळी म्हणाले.
गांगुली विरुद्ध कोहली
गांगुलीने नुकतेच म्हटले होते की, टी-20 कर्णधारपद सोडताना, त्याने स्वतः कोहलीला राजीनामा देऊ नये असे सांगितले होते. मात्र, त्याला कोणीही रोखले नसल्याचे कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले. कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला आहे आणि त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेवर गालबोट लागत आहे. कपिल देव पुढे म्हणालो की, कोहलीने बोर्ड अध्यक्षांविरोधात बोलायला नको होते. मी कोहलीचा खूप मोठा चाहता आहे, पण कोणत्याही खेळाडूने बीसीसीआय अध्यक्ष किंवा बोर्डाच्या विरोधात बोलू नये. जेव्हा मला कर्णधारपदावरून वगळण्यात आले तेव्हा मला खूप त्रास झाला होता, पण तुम्ही देशासाठी खेळत आहात हे लक्षात ठेवा. यापेक्षा जास्त काही महत्त्वाचे नाही.”
कसोटी सामन्यावर परिणाम होऊ नये
या संपूर्ण गदारोळानंतर बीसीसीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसले, तरी सध्याच्या वादाचा कोहलीच्या कसोटीतील कर्णधारपदावर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा कपिल देव यांनी व्यक्त केली आहे. मला आशा आहे की, या वादाचा विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदावर परिणाम होऊ नये. तो एक महान खेळाडू आणि महान क्रिकेटपटू आहे. निवडकर्ते असाच विचार करतील अशी आशा आहे. विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
( हेही वाचा :जनरल नरवणे यांची ‘चीफ ऑफ स्टाफ कमिटी’च्या अध्यक्षपदी नियुक्ती )
Join Our WhatsApp Community