आपल्या चौफेर फलंदाजीच्या जोरावर जगातील क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या विराट कोहलीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचे कर्णधारपद भूषवणा-या विराट कोहलीने टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टी-20 विश्वचषकानंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचे त्याने ट्वीट करत सांगितले आहे.
एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारांचे एकहाती कर्णधारपद भूषवणा-या विराट कोहलीचे रनमशीन गेल्या काही काळापासून संथ गतीने धावत आहे. त्याच्यावर कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे त्याला आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करता येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे होते. त्यामुळेच विराट कोहलीने हा निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे.
🇮🇳 ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J
— Virat Kohli (@imVkohli) September 16, 2021
सर्वांचे मानले आभार
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला भारताचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. संघातील खेळाडू, सहकारी स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि तो प्रत्येक भारतीय ज्याने भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांचे आभार. ज्यांनी-ज्यांनी मला कर्णधार म्हणून मदत केली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो त्यांच्याशिवाय मला ते शक्यच नव्हतं.
काय आहे कारण?
गेल्या 8-9 वर्षांपासून सतत तिन्ही प्रकारांत खेळल्याने आणि 5-6 वर्षांपासून तिन्ही प्रकारांत कर्णधारपद भूषवत असल्याने माझ्यावर कामाचा खूप ताण वाढला आहे. या व्यस्त वेळापत्रकातून स्वतःला थोडा वेळ देता यावा आणि भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी स्वतःला नव्या जोमाने तयार करण्यासाठी मी टी-20 कर्णधारपद सोडत आहे, असे विराटने म्हटले आहे.
चर्चा करुन निर्णय
हा निर्णय घेणं नक्कीच सोपं नव्हतं, यासाठी बराच वेळ लागला. बरंच चिंतन आणि सहका-यांशी चर्चा केल्यानंतर या निर्णयावर पोहचलो आहे. माझे जवळचे लोक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करुन दुबईतील टी-20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी यासंदर्भात विचारविनिमय करुन हा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community