- ऋजुता लुकतुके
भारतीय स्पर्धा आयोग अर्थात, सीसीआयने एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलिनीकरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे एअर इंडिया देशातील सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय विमान कंपनी होईल.
एअर इंडिया आणि विस्तारा या विमान कंपन्यांच्या विलिनीकरणाला भारतीय स्पर्धा आयोगाने अखेर परवानगी दिली आहे. पण, या विलिनीकरणासाठी आयोगाने काही अटीही घातल्या आहेत. विलिनीकरणाचा करार करताना सर्व कंपन्यांची मान्य केलेल्या शर्तींचं पालन ही आयोगाची पहिली अट आहे. त्याचबरोबर सध्या विस्ताराचा संयुक्त ताबा असलेल्या सिंगापूर एअरलाईन्सला नवीन कंपनीतील हिस्सेदारी समभागांच्या रुपाने मिळावी, अशी अटही आयोगाने घातली आहे.
टाटा समुहाने यापूर्वी एअर इंडियाची मालकी मिळवून पुन्हा एकदा प्रवासी विमान क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. त्यानंतर देशातील विमान उद्योगात घट्ट पाय रोवण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे. त्या प्रयत्नांना विस्तारा विलिनीकरणामुळे बळकटी मिळेल. कारण, एअर इंडिया आता आकाराने देशातील सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय विमान कंपनी होईल.
भारतीय स्पर्धा आयोगाने शुक्रवारी ट्विट करून विलिनीकरणाविषयीचा आपला निर्णय जाहीर केला. विस्तारा आणि एअर इंडिया या टाटा समुहातील दोन कंपन्या आहेत. पण, विस्तारामध्ये सिंगापूर एअरलाईन्सची ४९ टक्के भागिदारी आहे. आता विलिनीकरणाच्या करारानुसार, विस्तारा कंपनी एअर इंडियामध्ये विलीन होईल. पण, नवीन कंपनीचे काही समभाग सिंगापूर एअरलाईन्सला मिळतील.
C-2023/04/1022 CCI approves the merger of Tata SIA Airlines into Air India, and acquisition of certain shareholding by Singapore Airlines in Air India subject to compliance of voluntary commitments offered by the parties.#CCIMerger #Mergers pic.twitter.com/QihGf4xxus
— CCI (@CCI_India) September 1, 2023
या करारावर पहिल्यांदा बोलणी सुरू झाली तेव्हा स्पर्धा आयोगाने काही शंका व्यक्त केल्या होत्या. या विलिनीकरणानंतर तयार होणारी नवीन कंपनी देशांतर्गत विमान उड्डयण क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करेल असा पहिला संशल आयोगाने व्यक्त केला होता.
नोव्हेंबर २०२२ मध्ये टाटा समुहाने पहिल्यांदा सिंगापूर एअरलाईन्सशी बोलणी सुरू केली. पण, हे विलिनीकरण झालं तर टाटा समुहाकडे देशातील सात विमान मार्गांवर ५० टक्केच्या वर हिस्सेदारी जाईल. आणि एअर इंडियाचा दबदबा निर्माण होऊन जो या क्षेत्रासाठी घातक असेल अशी भीती आयोगाला वाटत होती. पण, आता या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
यानंतर एअर इंडिया कंपनी देशातील आंतरराष्ट्रीय सेवा देणारी सगळ्यात मोठी आणि देशांतर्गत विमान सेवेतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनणार आहे.