ऋजुता लुकतुके
‘आगामी आशियाई क्रीडास्पर्धेसाठी याहून चांगल्या भारतीय संघाची मी कल्पनाही करू शकलो नसतो,’ अशा शब्दात पाच वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या विश्वनाथन आनंदने सध्याच्या युवा भारतीय बुद्धिबळपटूंचं कौतुक केलं आहे. अलीकडे अझरबैजानमध्ये बाकू इथं झालेल्या बुद्धिबळ विश्वचषकात चौघा भारतीयांनी उपउपान्त्य फेरीपर्यंत मजल मारली. तर यात प्रग्यानंदने अंतिम फेरीत अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसनलाही जेरीला आणलं. आणि शेवटी रौप्य पदक जिंकलं. तर गेल्याच आठवड्यात आनंदच्याच छायेत तयार झालेला आणखी एक युवा भारतीय खेळाडू डी गुकेश जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. आनंदची ३७ वर्षांची सद्दी गुकेशने मोडून काढली. विशेष म्हणजे गुकेश आणि प्रग्यानंद हे विशीच्या आतले आहेत.
दोघंही आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खेळणार आहेत. आणि त्यांच्या तसंच इतर युवा खेळाडूंच्या हातात भारतीय बुद्धिबळाचं भविष्य सुरक्षित आहे, असं विश्वनाथन आनंदला वाटतं. आशियाई स्पर्धेतील आव्हानाबद्दल बोलताना आनंद म्हणतो, ‘चीन, व्हिएतनाम तसंच उझबेकिस्तान असे सगळेच संघ चांगले आहेत. स्पर्धा कसदार होणार आहे. पण, यापेक्षा चांगला भारतीय संघ आपल्याला मिळाला नसता, एवढं मी नक्की सांगू शकतो.’
पुढे खेळाडूंच्या यशाचं श्रेयही आनंदने प्रत्येक खेळाडूला दिलं आहे. ‘देशातील बुद्धिबळाचा स्तर या घडीला जगातील कुठल्याही प्रमुख देशातील स्तराच्या जवळ जाणारा आहे. एकापेक्षा एक चांगले खेळाडू घडतायत. आणि ते ऐन तारुण्यात आहेत. पण, देशात तसं वातावरण तयार झालंय म्हणून नव्हे, तर खेळाडूंनी स्वत:वर मेहनत घेतलीय, म्हणून ते पुढे आले आहेत,’ असं आनंदने आवर्जून नमूद केलं.
(हेही वाचा-Konkan Railway : ७ जुलैला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, अनेक गाड्यांवर होणार परिणाम; वाचा सविस्तर…)
विश्वनाथन आनंद कोलकाता इथं टाटा स्पेस बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आला आहे. तिथे त्याने मीडियाशी मनमोकळा संवाद साधला. महिलांमध्ये दोनवेळा आशियाई सुवर्ण जिंकणारी कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणवल्ली यांचंही आनंदने कौतुक केलं. आणि त्या पदक जिंकू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
विश्वनाथन आनंदने स्वत: त्याचं शहर चेन्नईत तीन वर्षांपूर्वी विश्वनाथन आनंद बुद्धिबळ अकॅडमी स्थापन केली आहे. तिच्या माध्यमातून तो देशातील तरुणांशी संपर्कात असतो. डी गुकेश याच अकॅडमीचा शिष्य आहे. त्यामुळे देशातील तरुण बुद्धिबळपटूंचा प्रतिभा आनंदला माहीत आहे. त्यांच्याबद्दल तो आश्वासकही आहे.
‘गुकेश, प्रग्यानंद आणि अर्जुन हे तिघे विशीच्या आतले आहेत. म्हणजे पूर्ण तयार होण्यासाठी त्यांच्याकडे अजून दहा वर्षं आहेत. पण, या दहा वर्षातंच ते आणखी शिखरं सर करू शकतात इतकं कौशल्य त्यांच्याकडे आहे. हे जे भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात घडतंय त्याची तुलना मी १९८० किंवा त्या आधीच्या दशकात रशियात घडत होतं, त्याच्याशीच करू शकतो,’ असं शेवटी आनंद म्हणाला.
होआंगझाओ इथं होणाऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेसाठी भारतीय बुद्धिबळ संघ पुढील प्रमाणे,
पुरुष – आर प्रग्यानंद, डी गुकेश, अर्जुन एरिगसी, विदित गुजराती व पी हरिकृष्णा
महिला – कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, वंतिका अगरवाल व सविता श्री
हेही पहा-
Join Our WhatsApp Community