WFI Row : कुस्तीच्या तात्पुरत्या समितीने केली राष्ट्रीय स्पर्धेची घोषणा 

कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धा २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान जयपूरमध्ये होतील 

213
World Wrestling Championship : जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून भारताने माघार का घेतली?

ऋजुता लुकतुके

कुस्ती फेडरेशनची (WFI Row) कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर ऑलिम्पिक असोसिएशनने तीन सदस्यीय तात्पुरत्या समितीची धोषणा तीन दिवसांपूर्वी केली होती. या समितीने कुस्तीचा कारभार हाती घेतला असून कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धेची घोषणाही केली आहे.

जयपूरमध्ये २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार असून वरिष्ठ गटात फ्रीस्टाईल, ग्रीको-रोमन यासह महिला गटातील सामनेही होणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन नवीन तात्पुरती समिती करणार आहे. आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बरखास्त झालेल्या कार्यकारिणीच्या कुठल्याही सदस्याने यात ढवळाढवळ करू नये असं समितीने स्पष्ट केलं आहे.

(हेही वाचा-LPG Price : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारची भेट ; एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात)

समितीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकातही त्याविषयी स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. ‘स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंनी कुठल्याही परिस्थितीत बरखास्त कार्यकारिणीच्या सदस्यांशी संपर्क करू नये,’ असं या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. जयपूरच्या गणपतीनगर इथं रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या मैदानावर कुस्ती स्पर्धा होणार आहे.

एका आठवड्यापूर्वी क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित कुस्ती फेडरेशनची कार्यकारिणी बरखास्त केली होती. या समितीने नियुक्तीनंतर घेतलेले निर्णय फेडरेशनच्या घटनेला धरुन नव्हते, असा ठपका क्रीडा मंत्रालयाने ठेवला होता. आणि त्यानंतर वुशू संघटनेचे अध्यक्ष भुपिंदर बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली एक तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे जी, कुस्तीचा दैनंदिन कारभार पाहील.

या समितीत बाजवा यांच्याबरोबरच माजी बॅडमिंटनपटू मंजुषा कनवर आणि माजी हॉकीपटू एम एम सोमय्या यांचा समावेश आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.