टी-20 विश्वचषकातील भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयकडून काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. बीसीसीआयने माजी खेळाडू चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला हटवल्यानंतर या समितीत सदस्यांचा नव्याने समावेश करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अनेक माजी खेळाडूंनी अर्ज दाखल केले असून, त्यामध्ये अनेक धक्कादायक नावं समोर येत आहेत.
यांनी दाखल केले अर्ज
निवड समितीमध्ये सदस्यांची निवड करण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या समितीतील सदस्यत्वासाठी माजी फिरकीपटू मनिंदर सिंह,माजी सलामीवीर शिव सुंदर दास यांनी अर्ज दाखल केल्याचे समजत आहे. या दोघांनीही भारतीय क्रिकेट संघासाठी 20 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. तसेच माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी देखील अर्ज दाखल केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः आता रेल्वेमध्येही मिळणार मराठमोळी पुरणपोळी, ‘असा’ आहे IRCTC चा नवा मेन्यू)
तसेच मुंबईच्या सिनिअर टीमच्या निवड समितीचे सध्याचे प्रमुख सलील अंकोला,माजी यष्टीरक्षक समीर दिघे आणि माजी फलंदाज विनोद कांबळी यांनी देखील अर्ज दाखल केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या दिग्गजांपैकी निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं आहे.
निवड समितीच्या प्रमुखपदासाठीची पात्रता
- ज्या खेळाडूने 7 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत
- 30 पेक्षा जास्त फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत
- 10 वन-डे किंवा 20 लिस्ट-ए सामने खेळले आहेत
- 5 वर्षांपेक्षा कमी काळात क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असावी
- बीसीसीआय किंवा इतर कोणत्याही समितीचा सदस्य नसावा आणि पुढील 5 वर्षांसाठी सेवा करण्यास सक्षम असावा