या विश्वचषकात विराट कोहली (Virat Kohli) सुसाट आहे. ९ सामन्यांमध्ये ५९४ धावांसह तो या स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. अलीकडेच त्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. आता उर्वरित स्पर्धेत विराटला आणखी काही विक्रम खुणावतायत.
या स्पर्धेत विराटने (Virat Kohli) आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. आणि आता विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याची संधी त्याच्याकडे आहे. सध्या तो ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगच्या विश्वचषक धावांपासून ११९ धावांनी दूर आहे.
विराट कोहली (Virat Kohli) आतापर्यंत चार विश्वचषक स्पर्धा खेळला आहे. आणि यात ३५ सामन्यांमध्ये ५८ धावांच्या सरासरीने त्याने १,६२४ धावा केल्या आहेत. यात त्याने ४ शतकं आणि ११ अर्धशतकं ठोकली आहेत. तर रिकी पाँटिंगने ४६ विश्वचषक सामन्यांमध्ये १,७४३ धावा केल्या आहेत. आणि त्याची सरासरी आहे ४५ धावांची.
अर्थात, या यादीत सगळ्यात वर जाण्यासाठी विराटला (Virat Kohli) आणखी एक आव्हान पार करावं लागणार आहे आणि ते आहे सचिन तेंडुलकरच्या २,२७८ धावांचं. सचिन तेंडुलकरने ४५ विश्वचषक सामन्यांमध्ये ५६.९५ च्या सरासरीने २,२७८ धावा केल्या आहेत. आणि तिथे पोहोचण्यासाठी विराटला नक्कीच आणखी एक स्पर्धा खेळावी लागेल. सध्या न्यूझीलंड विरुद्ध त्याने १२० धावा केल्या तर तो रिकी पाँटिंगला मागे टाकेल. आणि या शतकामुळे तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकेल. मुंबईत सचिन तेंडुलकरसमोर हा विक्रम घडला तर त्याची गोडी काही वेगळीच असेल.
एकदिवसीय विश्वचषकातील सगळ्यात जास्त धावा करणारे क्रिकेटपटू पाहूया…
खेळाडू |
सामने |
धावा |
सचिन तेंडुलकर |
४५ |
२,२७८ |
रिकी पाँटिंग |
४६ |
१,७४३ |
विराट कोहली |
३५ |
१,६२४ |
कुमार संगकारा |
३७ |
१,५३२ |
डेव्हिड वॉर्नर |
२७ |
१,४९१ |