भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (भज्जी) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आज, शुक्रवारी निवृत्ती जाहीर केली. २३ वर्षे व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर त्याने ट्वीट करून ही घोषणा केली. मूळचा जालंधरचा असलेल्या ४१ वर्षीय हरभजनने वयाच्या १७ व्या वर्षी २५ मार्च १९९८ रोजी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो ज्या खेळाडूंच्या सोबत क्रिकेट खेळत होता, त्या सर्वांनी या आधीच निवृत्ती घेतली आहे.
सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असतो!
हरभजनने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असतो. मला आयुष्यात सर्व काही देणाऱ्या क्रिकेटचा आज मी निरोप घेत आहे. माझा क्रिकेटमधला हा २३ वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. मी मनापासून आभार मानतो.
All good things come to an end and today as I bid adieu to the game that has given me everything in life, I would like to thank everyone who made this 23-year-long journey beautiful and memorable.
My heartfelt thank you 🙏 Grateful .https://t.co/iD6WHU46MU— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 24, 2021
अशी आहे भज्जीची क्रिकेट कारकिर्द
हरभजनने अखेरची कसोटी आणि वनडे २०१५ साली, तर २०१६ साली अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर तो फक्त देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत होता. आपल्या १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत १०३ कसोटी, २३६ वनडे आणि २८ टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले. या काळात त्याने कसोटीत ४१७, वनडेत २६९ आणि टी-२० मध्ये २५ बळी घेतले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून तो भारताच्या राष्ट्रीय संघाकडून खेळला नाही. मैदानावर आक्रमक आणि उत्साही असणाऱ्या भज्जीने स्वत:ची खास ओळख तयार केली होती.
(हेही वाचा – कोरोना मृतांच्या यादीत तब्बल 216 लोकं जिवंत! वाचा संतापजनक प्रकार)
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून हरभजन खेळत आहे. आयपीएलमध्ये त्याने १६३ सामन्यांत १५० बळी घेतले आहेत. २०२० मध्ये त्याने आयपीएल खेळण्यास नकार दिला होता. २०२१ मध्ये तो केकेआर संघात दाखल झाला, त्याला केवळ तीन सामन्यांत संधी मिळाली पण तो एकही बळी घेऊ शकला नाही. भज्जीला मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्याच्या नेतृत्वाखाली २०११ साली मुंबई इंडियन्सने चॅम्पियन लीग २०-२० चा खिताब जिंकला होता.
चित्रपटांतूनही साकारली भूमिका
हरभजनने क्रिकेटसोबत मुझसे शादी करोगे, सेकेंड हॅड हसबेंड या हिंदी, भज्जी इन प्रॉब्लेम या पंजाबी, तर काही तमिळ चित्रपटांत भूमिका साकारली आहे.
Join Our WhatsApp Community