Women’s T20 World Cup : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात, द. आफ्रिकन महिलांनी केला ८ गडी राखून पराभव

Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाची सलग १५ विजयांची मालिकाही संपुष्टात आली आहे. 

145
Women's T20 World Cup : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात, द. आफ्रिकन महिलांनी केला ८ गडी राखून पराभव
  • ऋजुता लुकतुके

महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघ ही अजूनही महासत्ता आहे. या महासत्तेला गुरुवारी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत अनपेक्षित धक्का बसला आहे. त्यांना अस्मान दाखवणारा संघ भारत, इंग्लंड नव्हता, तर तो होता दक्षिण आफ्रिकेचा. दक्षिण आफ्रिकन महिलांनी पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून आरामात पराभव केला. पुरुषांच्या टी-२० स्पर्धेप्रमाणेच महिलांनीही उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.

दुबईच्या धिम्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन महिलांनी पहिली फलंदाजी करत १३४ धावा केल्या तेव्हा हे आव्हान पुरेसं वाटत होतं. पण, लॉरा वेलवार्ड आणि तझमिन ब्रिट्स यांनी आफ्रिकेचा डाव सुरू केल्यावर चित्र पालटलं. तझमिन १५ धावांवर बाद झाली. पण, सुरुवात वेगवान झाली होती आणि त्यानंतर वेलवार्ड आणि ॲनेक बॉश यांची जोडी जमली. त्यांनी ऑस्ट्रेलियाचं आव्हानच संपुष्टात आणलं. दोघींनी ९५ धावांची भागिदारी केली. वेलवार्ड ४३ धावांवर बाद झाली. तर बॉश ७४ धावांवर नाबाद राहिली.

(हेही वाचा – Central Railway वर तब्बल २२ तासांचा पॉवर ब्लॉक; कोणत्या ट्रेन रद्द?)

अखेर ८ गडी आणि १६ चेंडू राखून आफ्रिकन महिलांनी विजय साकार केला. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकच गोलंदाजाने किमान ६ च्या धावगतीने धावा बहाल केल्या. सदरलँडने दोन्ही आफ्रिकन बळी घेतले. पण, वर्चस्व आफ्रिकन संघाचंच होतं. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियन महिलांचा खेळ त्यांच्या लौकिकाला साजेशा नव्हताच. मोठी धावसंख्या त्यांच्याकडून झालीच नाही. आणि ठरावीक अंतराने फलंदाज बाद झाले. बेथ मूनीने ४२ धावा केल्या. तर तळाला एलिस पेरीने ३१ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १३० धावांचा टप्पा ओलांडला.

नाबाद ७४ धावा करणारी ॲनेक बॉश सामनावीर ठरली. आता दुसरा उपान्त्य सामना शुक्रवारी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांदरम्यान होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पुन्हा एकदा दुबईत होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.