झुलन गोस्वामीने रचला इतिहास, ‘हा’ केला रेकाॅर्ड!

134

भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. चकदा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या 39 वर्षीय झुलनने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 39 बळी घेतले आहेत. झुलनने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर लिन फुलस्टनची बरोबरी करुन विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे. फुलस्टनने 1982-1988 दरम्यान विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या 20 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला, तर झुलनने 39 विकेट घेण्यासाठी 30 सामने खेळले आहेत.

विकेट घेऊन इतिहास रचला

झुलन गोस्वामीने गुरुवारी न्यूझीलंडच्या कॅटी मार्टिनचा  39 वा बळी घेतला. अखेरच्या षटकात झुलनने हा बळी घेतला. या सामन्यात झुलनने 9 षटके टाकली आणि 41 धावांत एक बळी घेतला. तिने एक मेडन ओव्हरही टाकला. बंगालच्या या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत 12 कसोटीत 44 बळी, 197 एकदिवसीय सामन्यात 248 बळी आणि 68 टी-20 सामन्यात 56 बळी घेतले आहेत. टीम इंडियाला 12 मार्चला वर्ल्ड कपमध्ये पुढचा सामना खेळायचा आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात झुलन उतरेल तेव्हा ती फुलस्टोनचा विक्रम मोडेल, अशी अपेक्षा आहे.

( हेही वाचा: क्रिकेटचे नियम बदलणार, जाणून घ्या कोणत्या नियमांत करण्यात आला बदल! )

झुलनचा पाचवा विश्वचषक

भारतीय महिला संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी गेली 20 वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळत आहे. झुलनचा हा ५वा विश्वचषक आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 261 धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंडकडून अॅमी सॅटरथवेट (75) सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू होत्या, तर अमेलिया केरने 50 धावा केल्या. टीम इंडियासाठी पूजा वस्त्राकरने 34 धावा देत 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघ 198 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघ आजपर्यंत एकही विश्वचषक जिंकू शकलेला नाही. यावेळी टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल अशी भारतीयांना आशा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.