नीरज चोप्राची ‘रूपेरी’ कामगिरी, 19 वर्षांनंतर भारताने जिंकले पदक!

136

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याने 88.13 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्य पदक जिंकले. अशाप्रकारे तब्बल 19 वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत पदक मिळाले आहे. यापूर्वी 2003 मध्ये लॉन्ग जंपर अंजू बॉबी जॉर्जने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

(हेही वाचा – एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार; उद्धवसेनेकडून ‘हिंदुत्वा’चा मुद्दाही हायजॅक करण्याची तयारी?)

नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर भाला फेकला. तर नीरज चोप्रानं आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकत पुन्हा वापसी केली. नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर आला. नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर भाला फेकला आणि हा त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला.

जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकमध्ये ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सनने सुवर्ण पदक पटकावले. त्याने 90.54 मीटर भाला फेकला. विशेष म्हणजे नीरज चोप्राचे हे जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलेच पदक असून त्याने 2016 मध्ये ज्यूनिअर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालेफेकीत सुवर्ण पदक पटाकवले होते. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानतंर नीरजची ही दुसरी सर्वात चांगली कामगिरी मानली जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.