रोहित शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर हे खाते न उघडताच तंबूत परतल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि के. एल. राहुल (K. L. Rahul) यांनी ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देत भारताला (World Cup 2023) विजय मिळवून दिला. या दोघांच्या दमदार भागिदारीमुळे विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयाची गोड सुरुवात केली आहे. ३०० चेंडूत २०० धावा करण्याचे आव्हान भारताने ४१ षटकांत ६ गडी राखून पूर्ण केले, मात्र विजयी षटकार मारणाऱ्या के. एल. राहुल याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले.
भारतीय गोलंदाजानी सुरेख सुरुवात केल्यानंतर फलदांज हे छोटेसे आव्हान किती षटकांत पूर्ण करतात याची उत्सुकता होती, मात्र भारतीय फलंदाजानी निराशाजनक सुरुवात करून प्रेक्षकांना नाराज केले. त्यानंतर कोहली आणि के. एल. राहुल यांनी अतिशय संयमी खेळ करत भारताला पुन्हा सामन्यात आणून विजय मिळवून दिला. सामन्यातील ३८व्या षटकांत कोहली झेलबाद झाला; परंतु तोपर्यंत १०१ चेंडूत ७५ धावांची खेळी करून त्याने भारताला विजयाच्या जवळ नेऊन सोडले होते. के. एल. राहुल याने ९७, तर हार्दिक पांड्या याने धावांची खेळी केली.
(हेही वाचा – Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबद्दल PMO ने केला खुलासा .. काय आहे त्यांची भूमिका)
जडेजाने २८ धावांत घेतल्या ३ विकेट
चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघातील फिरकीपटूंनी दमदार कामगिरी केली. भारताच्या रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवले आणि फक्त २८ धावांत तीन विकेट घेतल्या. जडेजाला कुलदीप यादव आणि आर. अश्विन यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येवर लगाम लावता आला आणि त्यांना १९९ धावांत रोखले.
स्मिथ बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला
जसप्रीत बुमराने ऑस्ट्रेलियाला मिचेल मार्शच्या रुपात पहिला धक्का दिला. विराट कोहलीने त्याची भन्नाट झेल पकडला आणि भोपळा न फोडता तो बाद झाला. त्यानंतर काही काळ डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांची चांगली भागीदारी झाली. पण कुलदीप यादवने आपल्याच गोलंदाजीवर वॉर्नरला झेलबाद केले. वॉर्नरने सहा चौकारांच्या जोरावर ४१ धावा केल्या. वॉर्नर बाद झाला तरी स्मिथ हा दमदार फलंदाजी करत होता, पण जडेजाने त्याला क्लीन बोल्ड केले आणि भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. स्मिथने ५ चौकारांच्या जोरावर ४६ धावा केल्या. स्मिथ बाद झाला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला; कारण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
Join Our WhatsApp Community