ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना या विश्वचषकातील (World Cup 2023) २९ वा सामना होता आणि म्हणता म्हणता संपूर्ण साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत निम्मे सामने संपलेही आहेत. अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचा संघ वगळता, इतर ८ संघ प्रत्येकी ६ सामने खेळले आहेत. वरील दोन संघ सोमवारी आमने सामने येणार आहेत. अशावेळी गुणतालिकेवर नजर टाकून समजून घेऊया कुठला संघ कुठे आहे. आणि कुणाला आहे उपान्त्य फेरीची संधी?
या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघ अपराजित आहे. सहा सामन्यातून १२ गुण मिळवत ते अव्वल स्थानावर आहेत. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघ आतापर्यंत या स्पर्धेत एकदाही सर्वबाद झालेला नाही. म्हणजे एका डावात कधीही संघाने १० गडी गमावलेले नाहीत. उलट प्रतिस्पर्ध्यांना सर्वबाद करण्याची किमया चारदा केली आहे आणि हे संघ आहेत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि आता इंग्लंड.
(हेही वाचा-Vande Sadharan Express: सामन्यासाठी ‘वंदे साधारण एक्स्प्रेस)
त्यामुळे या गुणतालिकेत भारतीय संघाचं वर्चस्व आहे हे नक्की आहे आणि त्यांनी उपांत्य फेरी गाठलेली आहे.
त्या खालोखाल दक्षिण आफ्रिकन संघालाही उपांत्य फेरी गाठण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. या स्पर्धेत सातत्याने ३५० च्या वर धावा आणि प्रतिस्पर्ध्यांवर मोठे विजय यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ दिमाखात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. फक्त नेदरलँड्स संघाने एकदा या संघाला धक्का दिला. बाकी त्यांनी आपली आगेकूच कायम राखली आहे.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी आणखी दोन विजयांची आवश्यकता आहे. पैकी न्यूझीलंडचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेशी तर ऑस्ट्रेलियाचा मुकाबला इंग्लंडशी आहे. (World Cup 2023)
गतविजेते इंग्लंड भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्पर्धेतून चक्क बाद झाले आहेत. आणि गुणतालिकेतही शेवटच्या स्थानावर आहेत. त्यांच्या सारखीच अवस्था बांगलादेशचीही आहे. तर श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेदरलँड्स या संघांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी चमत्काराची गरज असेल. म्हणजेच त्यांना आपले उर्वरित सगळे सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील आणि इतर संघ आपापले सामने गमावण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. सध्यातरी स्पर्धेची गुणतालिका अगदी सुस्पष्ट आहे आणि यात फारसे बदल होण्याची चिन्हं नाहीत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community