वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशीपचा अंतिम सामना या चेंडूने खेळला जाऊ शकतो!

या सामन्यासाठी ड्यूक बॉलचा वापर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारताने इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशीपच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. हा सामना क्रिकेटचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात येणार होता पण आता साऊथम्पटनमध्ये हा सामना होण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी ड्यूक बॉलचा वापर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जूनमध्ये अंतिम सामना

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे(आयसीसी)ने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नसली तरी अशी घोषणा लवकरच करण्यात येईल अशी आशा आहे. साउथम्पटनमधील एजेस बॉल स्टेडियम येथे हा सामना पार पडणार असल्याचं कळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून, हा सामना लॉर्ड्सऐवजी साऊथम्पटन इथे होणार असल्याचे बोलले जात आहे. हा वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपचा सामना न्यूझीलंड आणि भारत या दोन संघांमध्ये १८ ते २२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

ड्यूक बॉल आहे काय?

पूर्वीपासून या ड्यूक बॉलचा क्रिकेट विश्वात वापर केला जात आहे. ड्यूक बॉल तयार करणारी कंपनी ही जगातील बॉल निर्मितीसाठी ओळखली जाणारी सर्वात जुनी कंपनी आहे. या कंपनीला जवळपास 225 वर्षांचा इतिहास असल्याचं म्हटलं जातं.

भारतीय व्यक्तीकडे मालकी

दिलीप जजोदिया या भारतीय व्यक्तीकडे या कंपनीची मालकी आहे. 1962 मध्ये ते इंग्लंडमध्ये पोहोचले. तिथं त्यांची मॉरेंट ही कंपनी क्रिकेच्या सामानाची निर्मिती करु लागली. 1987 मध्ये त्यांनी ड्यूक कंपनी खरेदी केली. ‘क्रिकेट नेक्स डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीनुसार हा चेंडू स्कॉटीश गाईच्या कातड्यापासून बनवण्यात येतो. ज्यामध्ये एंगस प्रजातीच्या गायीच्या कातड्याचा वापर होतो. ड्यूक बॉल हा फोर क्वार्टर चेंडू आहे. म्हणजेच चामड्याच्या चार तुकड्यांना जोडून हा चेंडू तयार करण्यात येतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here