- ऋजुता लुकतुके
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांना आता विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड चाचणी स्पर्धा खेळावी लागणार नाही. त्यांनी आवश्यक ती तंदुरुस्तीची प्रमाणपत्र सादर केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने त्यांना ही सूट दिली आहे.
क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक मोहिमेसाठी नेमलेल्या विशेष समितीने ज्येष्ठ कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी सादर केलेली तंदुरुस्तीची प्रमाणपत्र मान्य केली आहेत. त्यामुळे विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी दोघांना निवड चाचणी प्रक्रियेतून जावं लागणार नाही. याच आठवड्यात पंजाबच्या पटियाळामध्ये निवड चाचणी होणार आहे. आणि क्रीडा प्राधिकरणाने बजरंग आणि दीपक सह इतर ज्येष्ठ खेळाडूंना निवड चाचणी स्पर्धेतून आपली तंदुरुस्ती सिद्ध करा किंवा तंदुरुस्त असल्याची अधिकृत प्रमाणपत्र सादर करा असे निर्देश दिले होते.
(हेही पहा – Diet : डायटिंग करत असताना ‘या’ सफेद गोष्टी टाळा)
त्यानंतर आता दोघांनी आपली प्रमाणपत्र सादर केली आहेत. बजरंग पुनियाला २५ आणि २६ ला पटियाळामध्ये होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेत खेळायचं नव्हतं. आणि या काळात प्रशिक्षणासाठी त्याला परदेशात जायचं आहे. साईने आता त्याला तशी परवानगी दिली आहे. विश्वविजेतेपद स्पर्धा येत्या १६ सप्टेंबरला बेलग्रेडला होणार आहेत. तर २३ सप्टेंबरपासून चीनच्या होआंगझाओ शहरात आशियाई स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धांच्या तयारीसाठी बजरंगला परदेशात जायचं आहे.
बजरंगने टोकयो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे. तर दोघंही राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्ण विजेते आहेत. त्यामुळे नियमाप्रमाणे दोघांना निवड चाचणीच्या प्रक्रियेतून जावं लागलं नसतं. पण, अलीकडे कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधातील आंदोलनामुळे खेळाडू खेळापासून दूर होते. त्यामुळे क्रीडा प्राधिकरणाने यंदा सर्वांनाच तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी निवड चाचणी अनिवार्य केली होती.
आता बजरंग आणि दीपक यांनी निवड चाचणीतून मार्ग काढला आहे. परदेशात प्रशिक्षणाची त्यांची मागणीही क्रीडा मंत्रालयाने मान्य केली आहे. बजरंग पुनियाला २१ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर या कालावधीत किरगिझस्तान इथं सराव करायचा आहे. तर दीपक पुनिया याच कालावधीत रशियाला सराव करणार आहे.
विश्वविजेतेपद स्पर्धा ही ऑलिम्पिक नंतरची सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. तर यंदा पॅरिस ऑलिम्पिकसाठीचं पात्रता वर्ष सुरू झाल्यामुळे या स्पर्धेत पदक जिंकून ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेशाची संधीही कुस्तीपटूंना आहे. बजरंग ६५ किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व करतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community