नॉर्वेतील ओस्ले येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिकने रौप्यपदक जिंकत इतिहास घडवला आहे. ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारी अंशू मलिक ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. अंशूच्या या कामगिरीमुळे देशाभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अंशूची उल्लेखनीय कामगिरी
याआधी गीता फोगाट (2012), बबिता फोगाट (2012), पूजा धंदा (2018) आणि विनेश फोगाट (2019) या भारताच्या चार महिला कुस्तीपटूंनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले आहे. जागतिक चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचणारी अंशू ही तिसरी भारतीय आहे. याआधी सुशील कुमार आणि बजरंग पुनिया यांनी ही कामगिरी केली होती. अवघ्या 20 वर्षीय अंशू मलिकने संपूर्ण स्पर्धेत धाडसी कामगिरी केली. परंतु अंतिम फेरीत दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या अमेरिकेच्या हेलन मारौलिसकडून तिला पराभूत व्हावे लागले.
(हेही वाचाः ‘हे’ आहेत जगातील पॉवरफुल पासपोर्ट असलेले देश! भारताचा क्रमांक कितवा? वाचा)
सरिता मोरला कांस्यपदक
जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सरिता मोरने 59 किलो वजनी गटात स्वीडनच्या जोहाना लिंडबोर्गचा 8-2 असा पराभव करत कांस्यपदक मिळवले. जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी सरिता मोर ही, सहावी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली.
Join Our WhatsApp Community