Asian Games 2023 : विनेश फोगाट दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

विनेशच्या जागी आता अंतिम पनघळची निवड होण्याची दाट शक्यता आहे

223
Drama at Kusti Trials : विनेश फोगाटने अडवून धरली निवड चाचणी स्पर्धा
  • ऋजुता लुकतुके

आशियाई स्पर्धेत थेट प्रवेश मिळालेली विनेश फोगाट अखेर दुखापतीमुळे स्पर्धेत खेळू शकणार नाहीए. त्यामुळे अंतिम पनघळची वाट मोकळी झाली आहे. कुस्ती महासंघाच्या तात्पुरत्या समितीने आशियाई स्पर्धेसाठी थेट प्रवेश देऊनही आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट स्पर्धेत खेळू शकणार नाहीए. गुडघ्याच्या दुखापतीमुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचं तिने एका ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. तिच्या दुखऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकसह विनेश आघाडीवर होती. या आंदोलनात खेळाडूंचा बराच वेळ गेल्यामुळे क्रमवारीच्या जोरावर या तीन ज्येष्ठ खेळाडूंना आशियाई स्पर्धेत थेट प्रवेश देण्याची निर्णय कुस्तीचा कारभार हाकणाऱ्या तात्पुरत्या समितीने घेतला होता. या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. आणि साक्षी मलिकने असा थेट प्रवेश नाकारलाही होता. विनेश फोगाट २०१८ च्या जाकार्ता आशियाई खेळांची सुवर्ण विजेती खेळाडू होती. आणि आपलं पदक राखण्यासाठी ती उत्सुकही होती. पण, आता दुखापतीमुळे यावर विरजण पडलं आहे. मंगळवारी (१५ ऑगस्ट) तिने ट्विटरवर एक पत्रक प्रसिद्ध करून दुखापतीविषयी माहिती दिली.

(हेही वाचा – Rainfall : राज्याच्या ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, मुंबईसह कोकणात रिपरिप)

यात विनेश म्हणते, ‘मला तुम्हाला एक अत्यंत दु:खद बातमी सांगायची आहे. दोन दिवसांपूर्वी सरावा दरम्यान माझ्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. आणि स्कॅन तसंच इतर चाचण्यांनंतर आम्ही १७ ऑगस्टला मुंबईत गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं आहे. पण, त्यामुळे आगामी आशियाई स्पर्धेत मी खेळू शकणार नाही.’ आशियाई स्पर्धा २३ सप्टेंबरपासून चीनच्या हूआंगझाओ इथं होत आहेत. विनेशच्या जागी आता अंतिम पनघळची निवड होण्याची दाट शक्यता आहे. कारण, आशियाई स्पर्धेच्या निवड चाचणीत विनेशच्या ५३ किलो वजनी गटात अंतिम पहिली आली होती. पण, विनेशला थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिची संधी हुकली.

त्यानंतर विनेशला थेट प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधात अंतिम आणि विशाल कालीरमण कोर्टातही गेले होते. विशाल ६३ किलो गटात पुरुषांमध्ये पहिला आला. पण, इथं बजरंगला थेट प्रवेश दिल्यामुळे त्याची संधी हुकली होती. अंतिम पनघळ सध्या जॉर्डनमध्ये आहे. २० वर्षांखालील गटातील विश्वविजेतेपदाची स्पर्धा ती खेळत आहे. विनेश फोगाटने म्हटल्याप्रमाणे आपल्या दुखापतीबद्दलची माहिती तिने सर्व प्रशासकीय विभागांना कळवली आहे. त्यामुळे तिच्या ऐवजी दुसऱ्या कुणाची तरी निवड करण्याचा मार्ग मोकळा आहे. दरम्यान बजरंग पुनियाने आशियाई खेळांसाठी सराव सुरू केला आहे. आणि सोनपतच्या आर्मी प्रशिक्षण केंद्रात सध्या तो सराव करत आहे. तो आशियाई स्पर्धेत खेळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.