कुस्ती जागतिक अजिंक्यपदासाठीचा भारतीय संघ निवडण्यासाठी येत्या २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान पटियाळा इथं निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. कुस्ती संघटना बरखास्त असल्यामुळे देशातील कुस्तीचा कारभार चालवणाऱ्या तात्पुरत्या समितीने हा निर्णय जाहीर केला आहे.
यापूर्वी याच समितीने आशियाई स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघ निवडताना विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना सवलत दिली होती. दोघं ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधातील आंदोलनामुळे सरावापासून काहीसे दूर होते. त्यामुळे त्यांना क्रमवारीनुसार संघ निवडीची मुभा देण्यात आली होती. पण, या निर्णयाचे प्रतिकूल पडसाद कुस्तीच्या वर्तुळात उमटले.
आधी विनेश आणि बजरंग यांच्याबरोबर साक्षी मलिकलाही ही सवलत मिळाली होती. पण, साक्षीने बाणेदारपणे ती नाकारली. पहिल्या अनुभवानंतर तात्पुरत्या समितीने आता निवड चाचणी स्पर्धा सगळ्यांसाठी अनिवार्य केली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा बेलग्रेड इथं १४ ते २६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. आपला निवड चाचणीचा निर्णय सगळ्यांना समजावा यासाठी समितीने कुस्ती महासंघाच्या घटनेतील संघ निवडीचे निकषही एका प्रसिद्धी पत्रकात समजावून सांगितले आहेत.
(हेही वाचा Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण)
त्यानुसार, ‘पदक विजेते खेळाडू किंवा २०२२ आणि २०२३ मध्ये कुठल्याही आंतरराष्ट्रीय, आशियाई, जागतिक दर्जा असलेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्यासाठी निवड चाचणी प्रक्रियेतून पार व्हावं लागेल. टोकयो ऑलिम्पिकमध्ये खेळलेले खेळाडूही निवड चाचणी स्पर्धा खेळतील.’
जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही ऑलिम्पिकच्या खालोखाल मानाची स्पर्धा मानली जाते. आणि २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता वर्ष सुरू झाल्यामुळे या स्पर्धेचं महत्त्व वाढलं आहे. यातल्या प्रत्येक गटात दोन खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात.
बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागाबद्दल मात्र अजून स्पष्टता नाही. कारण ही स्पर्धा आणि आशियाई क्रीडास्पर्धा जवळ जवळ आहेत. २३ सप्टेंबरला आशियाई स्पर्धाही सुरू होतेय. तिथे दोघांना थेट प्रवेश मिळाल्यामुळे दोघं तिथे खेळायला प्राधान्य देऊ शकतात. आणि तिथेही ऑलिम्पिक पात्रतेची संधी आहेच.
Join Our WhatsApp Community