देशात लवकरच धावणार 15 हजार 500 इलेक्ट्रिक बसेस, तर यूपी-बिहारचे रस्ते अमेरिकेप्रमाणे करणार गडकरींची माहिती

129

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचए) रस्तेनिर्मितीसाठी पुरेसा निधी आहे. देशातील उत्तरप्रदेश आणि बिहारमधील रस्ते अमेरिकेप्रमाणे करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नॅशनल हायवेज् इन्फ्रा ट्रस्ट शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. याप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. तसेच देशात ग्रीन कॉरिडोर तयार करून 15500 इलेक्ट्रिक बसेस घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी गडकरी यांनी सांगितले की, InvIT चा आमचा पहिला प्रयोग होता. आम्हाला जी रक्कम उभी करायची होती त्यापेक्षा 7 पटीने अधिक रक्कम उभी करण्यात यश आल्याने आनंद वाटतो आहे. एवढा प्रतिसाद हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची विश्वासार्हता दर्शवत असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. मुंबई शेअर बाजाराशी आपले जुने नाते असल्याचे त्यांनी यावेळी सांगत जुनी आठवण सांगितली. युती सरकारच्या काळात 1997 मध्ये मंत्री असताना इथं आलो होतो. त्यावेळी एमएसआरडीसीसाठी पैसे उभे करायचे होते. तेव्हा रक्कम अधिक मिळाली नाही. मात्र, विश्वासार्हता मिळवल्यानंतर अधिक पैसे बॉण्डच्या माध्यमातून उभे होत गेले. सरकारमधून बॉण्डच्या माध्यमातून पैसे उभे करणं अनेकांना कठीण वाटतं, मात्र यात चांगला परतावा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करणे हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. आमच्याकडे सध्या प्रकल्पांची कमतरता नाही. नरिमन पॉईंट ते दिल्ली हे अंतर 12 तासात पूर्ण करता येणार आहे. एक लाख कोटी खर्च करून आम्ही हा प्रकल्प 70 टक्के पूर्ण केला आहे. त्याशिवाय, आम्ही अनेक ग्रीन कॉरिडोर तयार करत असून 15500 इलेक्ट्रिक बसेस घेत आहोत, त्यामुळे प्रति किलोमीटर लागणारा खर्च खूप कमी आहे. असे गडकरींनी सांगतिले. भारतीय तंत्रज्ञान वापरून लेह-लडाखमध्ये रोप-रेल्वे तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी बीपीटीजवळ आम्ही वॉटर टॅक्सी-वे उभा करत आहोत, अशी माहिती देखील गडकरी यांनी दिली. सरकार लवकरच रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. गुंतवणूकदारांना मासिक आधारावर परतावा घेता येईल असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.