आकाशात झेपावणाऱ्या विमानाला अचानक पक्षी धडकल्यामुळे एअर एशियाच्या विमानाचे रविवारी सकाळी लखनऊ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. लखनऊहून कोलकाता येथे जाणाऱ्या या विमानाला पक्षी धडकून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. परंतु, सुदैवाने हे विमान सुखरुपपणे उतरवण्यात वैमानिकाला यश आले.
नक्की काय घडले?
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, एअर एशियाच्या (फ्लाईट क्र आय५-३१९) विमानाने रविवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेशातील लखनऊ विमानतळाहून कोलकाता येथे जाण्यासाठी उड्डाण केले. विमान टेकऑफ करताच विमानाला पक्ष्याने धडक दिली. अशा प्रकारच्या घटना या विमान अपघातास कारणीभूत ठरतात. परंतु, चालक दलाच्या समयसूचकतेमुळे हा अपघात टळला.
घटनेच्या चौकशीचे निर्देश
पायलटने या विमानाचे सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग केले. घटनेच्या वेळी विमानात चालक दलासह (कॅबिन-क्रू) १८० प्रवासी स्वार होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड भीती पसरली. या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने कोलकाता येथे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान या घटनेची कारणमिमांसा करण्यासाठी चौकशीचे निर्देश देण्यात आल्याची माहिती एआयएक्स कनेक्टच्या प्रवक्त्यांनी दिली.
(हेही वाचा – पाकिस्तानात प्रवासी बस दरीत कोसळून ३९ जणांचा मृत्यू)
Join Our WhatsApp Community