55 प्रवाशांना न घेताच उड्डाण; DGCA कडून ‘गो-फर्स्ट’ला 10 लाखांचा दंड

तब्बल 55 प्रवाशांना न घेताच उड्डाण केल्याप्रकरणी डीजीसीएने गो-फर्स्ट विमान कंपनीला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर 55 प्रवाशांना न घेताच गो-फस्टच्या फ्लाईटने टेक-ऑफ केल्याची घटना 9 जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी डीजीसीएने विमान कंपनीला नोटीस बजावत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार सोमवारी 9 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता गो-फस्टचे जी-8-116 हे विमान बेंगळुरूहून नवी दिल्लीला जाणार होते. प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीनंतर या प्रवाशांना फ्लाईटपर्यंत नेण्यासाठी 4 बसेस पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी पहिल्या 2 बस पुढे गेल्या. त्यातील प्रवासी विमानात बसले. परंतु, 2 बसेस 55 प्रवाशांना घेऊन मागाहून येत होत्या.या विमानाचे 55 प्रवासी विमानतळावरील बसने फ्लाईटच्या दिशेने निघाले असतानाच या विमानाने प्रवाशांना न घेता उड्डाण केले. यासंदर्भातील चूक लक्षात येताच एअरलाइन्सने सर्व प्रवाशांना 4 तासांनंतर दुसऱ्या फ्लाइटने दिल्लीला पाठवले.

या घटनेनंतर एअरलाइन्स, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि पीएमओ यांना टॅग करत, अनेक लोकांनी या घटनेबद्दल ट्विटरवर तक्रार केली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, उड्डाण सुरू असताना सुमारे 55 प्रवासी बसमध्ये थांबले. या सर्व ट्विटला उत्तर देताना गो-फस्ट एअरलाईन्सने सांगितले की, आम्ही झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या 55 प्रवाशांपैकी 53 जणांना दुसऱ्या एअरलाइनद्वारे दिल्लीला पाठवण्यात आले. त्याच वेळी, 2 लोकांनी तिकीटाच्या रकमेचा परतावा मागितला आहे, त्यांचे पैसे परत केल्याचे एअरलाइन्सने सांगितले. या घटनेनंतर डीजीसीएने विमान कंपनीकडे या संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल मागितला होता. हा अहवाल आल्यानंतर डीजीसीएने या कंपनीवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here