मुंबई-बंगळुरू प्रवास फक्त ५ तासांत; हरित द्रुतगती मार्ग विकसित करण्याची योजना

205

राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले अधिक वाहतुकीचे राज्य महामार्ग 25 वर्षांसाठी स्वतःच्या ताब्यात घेण्याचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा विचार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. राज्य महामार्ग चार किंवा सहा पदरी रस्त्यांमध्ये विकसित केले जातील आणि या महामार्गावर पथकर आकारणी करुन, केंद्र सरकार ही गुंतवणूक भरुन काढेल, असेही ते पुढे म्हणाले. मुंबईत झालेल्या भारतीय राष्ट्रीय विनिमय सदस्यांच्या असोसिएशनच्या 12 व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी डिजिटल पद्धतीने मार्गदर्शन केले.

( हेही वाचा : दिवाळीत फिरायला जाताय? रेल्वेने प्रवाशांसाठी घेतलाय मोठा निर्णय )

12-13 वर्षांत पथकर आकारणीतून ही गुंतवणूक व्याजासह पूर्णपणे भरून निघेल, असेही ते पुढे म्हणाले. देशातील पायाभूत सुविधा विकसित करण्यास निधीपुरवठ्यासाठी वित्तीय बाजारांनी अभिनव मॉडेल घेऊन यावे. आम्ही पीपीपी मॉडेल अंतर्गत, गुंतवणूक आमंत्रित करत आहोत. आपण जर आपली गुंतवणूक कचरा व्यवस्थापन, हरित हायड्रोजन, सौरऊर्जा आणि अशा अनेक प्रकल्पात वळवली,तर आपण जगाला ऊर्जेची निर्यात करु शकतो. नवोन्मेष, उद्यमशीलता, विज्ञान आणि तंत्रज्ञान ही भारताची भविष्यातील संपत्ती आहे.” असे गडकरी म्हणाले. देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई आणि बंगळुरु दरम्यान हरित द्रुतगती मार्ग विकसित करण्याची योजना

पायाभूत सुविधांच्या विकासाविषयी बोलतांना ते म्हणाले की आम्ही मुंबई आणि बंगळुरु दरम्यान एक हरित द्रुतगती मार्ग विकसित करण्याची योजना करतो आहोत. या महामार्गामुळे हे अंतर पाच तासांत पूर्ण होईल आणि पुणे-बंगळुरु अंतर केवळ साडे तीन ते चार तासांत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याच्या रिंग रोडपासून एक वळण लागेल आणि तिथून बंगळुरूकडे जाणारा नवा द्रुतगती मार्ग सुरु होईल, असे त्यांनी पुढे सांगितले.

देशात 27 हरित द्रुतगती महामार्ग तयार होत आहेत. या वर्षाच्या अखेरीस, दिल्ली-डेहराडून हे अंतर 2 तासांत, दिल्ली-हरीद्वार 2 तासांत, दिल्ली-जयपूर 2 तासांत, दिल्ली-चंदीगड अडीच तासांत, दिल्ली-अमृतसर 4 तासांत, दिल्ली-श्रीनगर 8 तासात, दिल्ली-कटरा 6 तासात, दिल्ली-मुंबई 10 तासात, चेन्नई-बंगलोर 2 तासात आणि लखनौ-कानपूर केवळ अर्ध्या तासात पार करणारे द्रुतगती मार्ग बांधले जातील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. देशात, 2,50,000 कोटी रुपये खर्चून 75 बोगदे बांधण्याची प्रक्रिया सुरु असून, देशात दररोज सरासरी 40 किलोमीटरचे रस्ते बांधले जातात, अशी माहिती गडकरी यांनी दिली. सध्या देशात 65 लाख किमी लांबीचे रस्ते आहेत आणि त्यापैकी 1.45 लाख किमी हे राष्ट्रीय महामार्ग आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.