नाशिक – शिर्डी मार्गावर एका आराम बस आणि ट्रक च्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील बस बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टुरिस्ट बसवर मागील वर्षात तीन वेळा वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी चलन फाडण्यात आले आहे. त्याच वेळी जर या बसच्या मालकावर कडक कारवाई केली असती तर कदाचित हा भीषण अपघात टळला असता.
बस मालकावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने झालेल्या कारवाया
या भीषण अपघातातील बस क्र. एम एच ०४ एफके २७५१ या बसवर मागील वर्षात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. जर वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे या बसच्या मालकावर कडक कारवाई होणे अपेक्षित होते, तसे झाले असते तर कदाचित हा अपघात झालाच नसता. या बसच्या मालकाचे बालाजी मधुकर मुरुकटे असे नाव आहे.
सरकारकडून मृतांच्या नातलगांना मदत जाहीर
नाशिक-शिर्डी महामार्गावरच्या पाथरे जवळ ही खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १२ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदतही जाहीर करण्यात आली असून या अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले गेले आहेत.
Join Our WhatsApp Community