पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आणि जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी बस रॅपीड ट्रान्झिट म्हणजेच बीआरटी BRT सेवा सुरू करण्यात आली असली तरी शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी मार्ग कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी या वाहतूक कोंडीचे खापर महापालिकेवर फोडले आहे. वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर, सर्व बीआरटी मार्ग बंद करा आणि अनावश्यक सायकल मार्ग काढून टाका, असे पत्र पोलिसांनी महापालिकेला पाठविले आहे.
( हेही वाचा : ‘क’ वर्गाची पदे एमपीएससीतून भरणार, राज्य सरकारचा निर्णय )
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यावरून वाहतूक पोलिसांवर टीका होत आहे. शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र त्यानंतरही अवजड वाहने शहरात येत आहेत. तसेच बस, रिक्षा त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी थांबत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यानुसार अवजड वाहने शहरात प्रवेश करताना त्यांना वाहतूक पोलिसांनी अटकाव करावा आणि बस, रिक्षा यांना योग्य त्या ठिकाणी थांबे देण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community