Cyber Crime : मुंबईसह राज्यभरात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढती असून, गेल्या वर्षभरात एकूण ८ हजार ९४७ सायबर फसवणुकीचे (Cyber Fraud) गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांतर्गत तब्बल ७ हजार ६३४ कोटी २५ लाख ४६ हजार ५०८ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली आहे. पुण्यात सर्वाधिक म्हणजेच ६ हजार ७ कोटी ९३ लाख ४ हजार ३९८ रुपयांची फसवणूक (Fraud) झाली असून, मुंबईत सर्वाधिक ४ हजार ८४९ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून समोर आली. (Cyber Crime)
(हेही वाचा – Sushil Kumar : दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारला नियमित जामीन मंजूर)
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session 2025) दुसऱ्या दिवशी आमदार मोहन मते, ज्योती गायकवाड, विकास ठाकरे, अमिन पटेल, सुनील प्रभू यांच्यासह इतर अनेक पक्षांतील आमदारांनी राज्यातील नागरिकांच्या विविध प्रकरणांत झालेल्या सायबर फसवणुकीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या लेखी उत्तरात वरील माहिती उघडकीस आली आहे. या आकडेवारीनुसार मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे या शहरांमधील सायबर फसवणुकीबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
या आकडेवारीनुसार, मुंबई शहरात गेल्या वर्षभरात ४ हजार ८४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ७५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या ४ हजार ८४९ गुन्ह्यात एकूण ८८८ कोटी २९ लाख २३ हजार ९५ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. तर, ठाणे शहरात ६८० गुन्हे दाखल करण्यात आले व १३ जणांना अटक करण्यात आली होती. यात एकूण १७४ कोटी ४ लाख ३६ हजार ६ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरात एकूण २१२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांद्वारे एकूण ६३ कोटी ८५ लाख ९ हजार ५०१ रुपयांची फसवणूक करण्यात आली. पुणे शहरात एकूण १,५०४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केवळ नऊ जणांना अटक करण्यात आली असून, ६ हजार ७कोटी ९३ लाख ४ हजार ३९८ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा – मंत्री Hasan Mushrif यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपदाला दिली सोडचिट्ठी; म्हणाले, आता मला…)
महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प लवकरच
राज्यात एकूण ५० सायबर पोलिस ठाणी (Cyber Police Station) कार्यान्वित असून, या गुन्ह्यांच्या विश्लेषणासाठी अत्याधुनिक असे सेंटर ऑफ एक्सलेंस इन डिजिटल फॉरेन्सिक हे पुण्यात सुरू करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली. राज्यातील सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल सायबर पोलिस ठाण्यासह सहा प्रमुख विभाग कार्यरत असतील. तर, महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प ‘गो लाइव्ह’ अंतिम टप्यात असून, लवकरच तो कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community