Beggar : जास्त भीक मागण्यासाठी त्यांनी चोरले १० महिन्यांच्या मुलीला 

78
Beggar : जास्त भीक मागण्यासाठी त्यांनी चोरले १० महिन्यांच्या मुलीला 
Beggar : जास्त भीक मागण्यासाठी त्यांनी चोरले १० महिन्यांच्या मुलीला 

संतोष वाघ

आईच्या कुशीतून चोरीला गेलेल्या १० महिन्याच्या मुलीची सुखरूप सुटका करण्यात सीएसएमटी रेल्वे पोलिसांना (CSMT Railway Station) यश आले आहे. या चिमुरडीला पोलिसांनी अवघ्या पाच तासात शोधून काढत या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मध्ये दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. या तिघांनी भीक मागण्यासाठी या मुलीला चोरले होते अशी कबुली पोलिसांकडे दिली आहे. (Beggar)

रुबिना बीबी कुतुबशेर शेख (३५), अरबाज सुबेदार शहा (२१) आणि लाजीमा खातून (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रुबिना आणि लाजीमा या दोघी पश्चिम बंगालच्या असून अरबाज हा झारखंडचा राहणारा आहे. रुबिना आणि अरबाज हे दोघे एकत्र राहत होते तर लाजीमा ही मुंबईत भीक मागून फुटपाथवर राहत होती.

२४ सप्टेंबर रोजी गोवंडी परिसरात राहणारी तक्रारदार महिला तीन वर्षांचा मुलगा आणि १० महिन्याच्या मुलीला घेऊन कस्तुरबा रुग्णालयात आली होती. मुलाला रुग्णालयात दाखवून रात्री उशिरा ती सीएसएमटी रेल्वे स्थानकात आली. रात्री उशिर झाल्यामुळे तीला गोवंडीला जाण्यासाठी ट्रेन मिळाली नाही म्हणून, ती सीएसएमटी रेल्वे स्थानक येथे तिकीट हॉल येथे मुलांसह झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तीला जाग आली असता तिच्या कुशीत झोपलेली मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. तीने मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतु, मुलगी कुठेच सापडून आली नाही म्हणून मुलीच्या आईने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून मुलीचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासले, सीसीटीव्ही मध्ये एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली. सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असरुद्दीन शेख मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे, सपोनि.सतीश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सांगळे, ज्योती मदकट्टे, संदीप गायकवाड, दीपक शिंदे आणि गुन्हा प्रकटीकरण पथकातील अंमलदार आणि महिला अंमलदार यांचे पथक गठीत करण्यात आले.

(हेही वाचा – भारताचा दैदिप्यमान इतिहास प्रत्येकाला शिकवला तरच सद्य परिस्थिती बदलेल; अभिनेते Sharad Ponkshe यांचा विश्वास)

वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सतीश शिरसाठ आणि त्याचे पथकांनी सीएसएमटी ते सेंडहर्स्ट रोड, नागपाडा, जे जे रुग्णालय (J J Hospital) परिसरातील जवळपास १०० सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात एक महिला १० महिन्याच्या मुलीला घेऊन जातांना आढळून आली. पोलीस पथकाने या महिलेचा माग काढत नागपाडा परिसरातून या महिलेला १० महिन्याच्या मुलीसह ताब्यात घेऊन तीला पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडे चौकशी केली असता तिचे साथीदार नागपाडा परिसरातच असल्याची माहिती तीने दिली. पोलिसांनी तात्काळ इतर दोन साथीदाराना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

(हेही वाचा – Maharashtra assembly Election : मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्रात दाखल)

कामधंदा मिळत नसल्यामुळे रुबिना आणि अरबाजने भीक मागण्याचे ठरवले, परंतु धडधाकट बघून त्यांना भीक कोणी देत नव्हते. त्यात त्यांची ओळख लाजीमा खातून सोबत झाली. लाजीमा ही भीक मागण्याचे काम करीत असल्यामुळे तीने त्यांना लहान मुलं कमरेत असेल तर जास्त भीक मिळते असे सांगितले आणि दोघांनी लहान मूल चोरण्याचा विचार केला, दोघेही सीएसएमटी येथे आले व त्यांनी १० महिन्याचे मुल चोरले. पाच तासात या दोघांनी या मुलीला रस्त्यावर झोपवून भीक ही मागितली, त्यानंतर ही मुलगी भीक मागण्यासाठी लाजीमा खातून ला देणार होते मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी या तिघांना अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली. मुलीला भीक मागण्यासाठी वापर करून पुढे या मुलीला इतर भिकाऱ्यांना भाड्याने देऊन पैसे कमविण्याची योजना या तिघांनी आखली होती. अशी माहिती तपासात समोर येत आहे. परंतु याबाबत पोलीस तपास करीत असून या तिघांची योजना काय होती हे तपासाअंती समोर येईल अशी माहिती वपोनि.विजय तायडे यांनी दिली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.