६० दिवस कोरोनाशी झुंज देणारा ‘बेस्ट’ योद्धा

104

राज्यासह संपूर्ण देशात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून, मुंबईमध्ये देखील आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईमध्ये तर एका व्यक्तीने चक्क ६० दिवसांनंतर कोरोनावर मात मिळवली आहे. पेशाने बेस्ट ड्रायव्हर असलेल्या दिलीप पायकडे (५५) यांना २६ जून रोजी मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ज्यावेळी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांना टायफॉईड आणि कोरोना ही दोन्ही लक्षणे दाखवली. तसेच त्यांची प्रकृती देखील नाजूक होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

WhatsApp Image 2020 08 26 at 4.45.05 PM

देव तारी त्याला कोण मारी?

देव तारी त्याला कोण मारी हे वाक्य दिलीप पायकडे यांच्या बाबतीत मात्र तंतोतंत खरे ठरले. दिलीप पायकडे यांची प्रकृती इतकी नाजूक होती की, त्यांना १७ दिवस व्हेंटीलेटर आणि ४३ दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र यावर मात करत आता पायकडे आता बरे झाले आहेत. नुकताच त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

WhatsApp Image 2020 08 26 at 4.44.57 PM

बेस्ट प्रशासनाची मिळाली साथ

हिंदुस्थान पोस्टशी बोलताना दिलीप पायकडे यांनी या कठीण काळात मदतीला धावून येणाऱ्या बेस्ट प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. घरच्यांच्या आणि बेस्ट प्रशासनाच्या साथीनेच आज मी कोरोनावर मात करून परतल्याचे पायकडे यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे बेस्टच्या चिकित्सा विभागाने रेमेडिसविर इंजेक्शनची व्यवस्था केल्याचे देखील त्यांनी सांगितले.

इतक्या बेस्ट कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या १७८२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत १६६२ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात ३, मे – १४९, जून – ३३२, जुलै ६६१ आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत ५१५ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

कामावर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

लॉकडाऊनच्या काळामध्ये गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई बेस्ट प्रशासनाने सुरूच ठेवली असून, आतापर्यत १५९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना चार्जशीट देऊन कामावर हजर राहण्याच्या सूचना केल्या. मात्र सूचना देऊनही हे कर्मचारी कामावर हजर राहिले नाही. जुलै महिन्यामध्ये ११२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.