कोविड सारख्या महामारीचा सामना करण्यासाठी मुंबईमध्ये कायमस्वरूपी रुग्णालय उभारण्याचा निर्णय पालिकेकडून जुलै महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला. त्यासाठी मुंबई महापालिकेने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील किमान २० एकरसाठी जागा मालकांकडून अर्ज देखील मागवले आहेत. मात्र या ५ हजार खाटांच्या महारुग्णालयासाठी आतापासूनच मोठ्या बिल्डर्संनी सेटींग लावायला सुरुवात केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये मुंबईतील दोन मोठे बिल्डर्स आघाडीवर असून, एका बिल्डरची मुंबईमध्ये मोठी कंपनी आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर खासगी जमीन आहे. तर दुसऱ्या एका बिल्डरचे स्वतःचे मोठे रुग्णालय आणि मुंबईत खासगी जमीन आहे. विशेष बाब म्हणजे ज्या दोन बिल्डर्संनी सेटींग लावायला सुरुवात केली आहे ते दोन्ही बिल्डर्स हे ‘मातोश्री’च्या जवळचे मानले जात आहेत.
मोठ्या मालकाला हवीय जागा
मुंबई महानगर पालिका ही आशिया खंडातील सगळ्यात मोठी महानगर पालिका म्हणून ओळखली जाते. याच मुंबई महानगर पालिकेचे असंख्य प्लॉट मुंबईमध्ये पडून आहेत. मात्र तरी देखील आज मुंबई महानगर पालिकेवर ५००० खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी कुणी जागा देतंय का जागा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
अनेक बिल्डर्स इच्छुक
मुंबईतील या दोन मोठ्या बिल्डर्सनी आतापासूनच सेटींग लावायला सुरुवात केली असली तरी देखील या महारुग्णालयासाठी आणखी काही मुंबईतील नामांकित बिल्डर इच्छुक आहेत. या बिल्डर्सनी देखील अर्ज भरले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज आलेल्यांपैकी एक-दोन बिल्डर्सचे अर्ज बाद देखील करण्यात आले आहेत.
गरजेनुसार जमिनीचे हस्तांतरण होणार
जमीन देण्यासाठी अर्ज मागविताना एकत्रित २० एकर जमीन खरेदी करण्यात येणार नसून, गरजेनुसार जमिनीचे हस्तांतरण करण्यात येईल असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ५ हजार खाटासाठी बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयात मुंबईतील रुग्णासाठी जागा रखीव ठेवण्यात येणार आहे. इतर वेळी नियमीत आजरासाठी हे रुग्णालय वापरण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community