५ हजार २२० मेगावॅट निर्मितीसाठी सामंजस्य करार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

211
५ हजार २२० मेगावॅट निर्मितीसाठी सामंजस्य करार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
५ हजार २२० मेगावॅट निर्मितीसाठी सामंजस्य करार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेऊन राज्य सरकारकडून सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून बुधवारी महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून सुमारे ४१ हजार कोटींची गुंतवणूक आणि ६ हजार ७६० रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बुधवारी सहयाद्री अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. २०३० पर्यंत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के विजेची पूर्तता नवीकरणीय ऊर्जेद्वारे करावयाची आहे. ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीने सौर, जल, पवन आणि उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावी.

बुधवारी झालेल्या सामंजस्य करारानुसार अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ४०० एकर परिसरात १०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे ५०० कि.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास ४७२ कोटी १९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

(हेही वाचा – शिवसेनेची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा; चंद्रशेखर बावनकुळे यांची नाराजी)

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी येथे २५.६ मेगावॅट क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी ५१८ कोटीची गुंतवणूक होणार आहे. सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मेगावॅट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पी. अन्बलगन, सतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, मेडाच्या महासंचालक डॉ कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.