अडीच वर्षे आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली गतीशील सरकार चालवले, महाराष्ट्र आता थांबणार नाही असे आम्ही का म्हणतो, कारण अडीच वर्षे महाराष्ट्राने विकासाची जी गती पकडली त्याच गतीने महाराष्ट्र चालत राहणार आहे. त्याचा विश्वास आम्हाला आहे. मी २०१४ साली मुख्यमंत्री होतो तेव्हा एकनाथ शिंदे माझ्या मंत्रिमंडळात होते. २०१९ ला मी ७२ तासांसाठी मुख्यमंत्री होतो, पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, आता मी मुख्यमंत्री झाल्यावर शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आमच्यासाठी पदे महत्वाची नाहीत. आमची पदे जरी बदलली असली, तरी दिशा, गती आणि समन्वय तीच राहणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
View this post on Instagram
विरोधकांच्या संख्येनुसार त्यांचे मूल्यमापन करणार नाही
एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये आमची ५० ओव्हरची मॅच होती, त्यानंतर सरकारमध्ये अजितदादा आले आणि २०-२० झाली मात्र आता कसोटी आहे. त्यामुळे सर्व निर्णय आम्ही अभ्यासपूर्ण घेणार आहोत. वचननाम्यात आम्ही जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्यासाठी आम्ही पावले उचलणार आहोत. एक लोकभूमिक सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे सरकार, महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. बदल्याचे राजकरण करणार नाही, तर बदल दाखवण्याचे राजकारण करणार आहे. विरोधकांच्या संख्येनुसार त्यांचे मूल्यमापन करणार नाही, त्यांनी योग्य विषय मांडले, तर तितकाच त्यांचा सन्मान करणार आहे, स्थिर सरकार आम्ही देणार आहे. २०१९ नंतर राज्यात जे धक्के बसले, तसे होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा CM Devendra Fadnavis oath ceremony : शपथविधीच्या शासकीय सोहळ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष)
जुन्या मंत्र्यांच्या कामांचे मूल्यांकन सुरू
एकनाथ शिंदे यांची बिलकुल नाराजी नव्हती, उलट मी विनंती केल्यावर त्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचे तात्काळ स्वीकारले. मागच्या काळात मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितले, तेव्हा अमी सरकारच्या बाहेर राहण्याचा विचार केला होता, पण पक्षाचा मुख्य व्यक्ती जर सत्तेबाहेर असेल तर समन्वय बिघडतो. म्हणून आपण एकनाथ शिंदे यांना विनंती केल्यावर त्यांनी लगेचच उपमुख्यमंत्री होण्याचे स्वीकारले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
२००४ आणि २०१२ मध्ये सरकार स्थापन करताना वेळ लागला होता. जेव्हा युती आणि आघाडीचे सरकार असते, तेव्हा वेळ लागतो. मंत्रिमंडळात कोणकोणते मंत्री असतील हे ठरले आहे. खात्यांमध्ये थोडे बहुत बदल होतील. कोणते खाते कुणाकडे असणार हे ठरेल आहे, जे जुने मंत्री होते, त्यांच्या कामांचे मूल्यांकन सुरु आहे, ते आम्ही तिघेजण करत आहोत, त्याआधारे पुढील निर्णय होणार आहे. त्यात प्रादेशिक समन्वय देखील साधणार आहे. ७, ८ आणि ९ डिसेंबर ला विशेष अधिवेशन होणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात यावी, तशी शिफारस राज्यपालांना आम्ही केली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. मात्र मागील काळात राज्य ज्या राजकीय वाटेवर जात आहे, संवाद संपला आहे. ही परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. म्हणून मी शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांना स्वतः फोन करून त्यांना निमंत्रित केले होते. महाराष्ट्रात राजकीय संवाद संपला, असे चित्र होते, पण तसे होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू केले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community