- सायली डिंगरे-लुकतुके
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू लाभलेले, वडील गंगाधरराव फडणवीस यांच्यामुळे बालपणीपासून संघशिस्तीत जडणघडण झालेले, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी वडिलांना कारागृहात पाठवले म्हणून इंदिरा कॉन्व्हेट स्कूलमध्ये शिकणार नाही, असा निर्धार बालपणीच व्यक्त करून सरस्वती विद्यालयात शिक्षण घेणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा शिलेदार म्हणून पुढे आले. प्रत्येक दसऱ्याला नागपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात ते संघाच्या गणवेशात सहभागी होतात. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदावर असतांनाही त्यांनी तो शिरस्ता मोडला नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांचे सहकारी असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि अन्य सरकारी योजनांचा प्रचार करत होते. अजित पवार हे आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचेच सांगत होते. असे असूनही देवेंद्र फडणवीस मात्र हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार करत होते. या आक्रमक हिंदुत्वानेच त्यांना या निवडणुकीत तारले, असे म्हणू शकतो. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा विराजमान होत असतांना त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीवर हिंदुत्वाचा कसा प्रभाव होता, याचे सिंहावलोकन तर व्हायलाच हवे.
विरोधी पक्षात असतांना हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर गाजवले सभागृह
राज्यात काँग्रेसचे सरकार असतांना भाजपा नेते एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते. त्या वेळी भाजपाचे आमदार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचे अनेक मुद्दे लावून धरत अभ्यासपू्र्ण भाषणांनी विधीमंडळ गाजवले. त्या वेळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांचेच भंजन करणारा कायदा आणण्याचे षडयंत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या समविचारींनी रचले होते. त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांची या कायद्यातील हिंदूविरोधी कलमांची पोलखोल करणारी भाषणे विधीमंडळात गाजली होती. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांचे अन्य सहकारी आमदार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या कायद्यातील जाचक कलमे वगळण्यात आली, हे त्यांचे हिंदुत्वाच्या दृष्टीने मोठे यश ठरले. त्याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उजेडात आणलेले सरकारीकरण झालेल्या विविध मंदिरांतील भ्रष्टाचार आणि अनेक प्रकारच्या घोटाळ्यांवर त्यांनी विधीमंडळात अभ्यासपूर्ण भाषणे केली. त्यातील काही प्रकरणांचा तर तपासही सुरु झाला. हे हिंदुत्वाचे हे विषय लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी तत्कालीन आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व आयुधे वापरली.
सत्तेत असतांना हिंदुत्ववादी आशेवर
वर्ष २०१४ मध्ये भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याच पुढाकाराने गोवंशहत्या बंदी कायदा लागू करण्यात आला. वारकरी संप्रदायाला दिलासा देण्यासाठी पालखी महामार्ग, पंढरपूर कॉरिडॉर असेही काही प्रकल्प हाती घेतले गेले. हिंदुत्वावरील आघातांचे विषय मात्र प्रतीक्षेत राहिले. सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील भ्रष्टाचार रोखणे, मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवणे, धर्मांतरविरोधी कायदा, लव्ह जिहादविरोधी कायदा, असे काही कायदे लागू होतील, अशी आशा अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना लावून बसल्या होत्या. ५ वर्षांत हिंदुत्ववादी युतीचे सरकार असूनही त्यांची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही.
(हेही वाचा AIMIM चे आमदार म्हणतात, लातूरमधील १०३ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी Waqf Board ला परत कराव्या लागतील)
ठाकरेंनी साथ सोडल्यावर पुन्हा हिंदुत्वाचा झेंडा
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी भाजपासोबत असलेली स्वाभाविक युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मोठा धक्का ठरला. राज्यातील सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजपाला त्या वेळी सत्ता स्थापन करता आली नाही. हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रीपदाचा घास उद्धव ठाकरे यांनी हिरावून घेतला. भाजपाने पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. गेली दीड वर्षे विविध विकासकामांसमवेत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याने कसे नुकसान झाले, हेच सांगितले गेले. आमदार आणि भाजपाचे प्रवक्ते नीतेश राणे मांडत असलेले आक्रमक हिंदुत्वाचे मुद्दे लोकांना भावत आहेत.
हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार
अयोध्येमध्ये श्रीरामजन्मभूमीवर रामलल्लाच्या मंदिराची उभारणी झाली आणि भाजपाने त्याच मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवली. लोकसभेतील पराभवाची अनेक कारणे असली, तरी केवळ हिंदुत्वाचे मुद्दे लोकसभेमध्ये पुरले नाहीत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. हा मोठा धक्का पचवत असतांनाच खरे पहाता महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीनेही चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते. राज्यात महायुतीला कमी आणि महाविकास आघाडीला अधिक जागा मिळू शकतात, असा भाजपाचाच अंतर्गत अहवाल आला होता. त्यानंतर महायुती सरकारने अनेक विकासप्रकल्प हाती घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या लोकप्रिय योजना राबवल्या. तरीही वातावरण दोलायमानच होते. महायुती किंवा महाविकास आघाडी असे कोणीही बाजी मारू शकते, असेच सर्व विश्लेषक सांगत होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक योजनांचा प्रचार करून झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात मात्र भाजपाने हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार केला. धर्मांधांची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाल्यास हिंदूंच्या सुरक्षेला धोका होईल, अशा प्रकारे प्रचार करण्यात भाजपा यशस्वी झाली. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है, तो सेफ है’, ‘वोट जिहादच्या विरोधात धर्मयुद्ध पुकारा’ यांसारख्या घोषणा देऊन भाजपाने हिंदूंना जागृत करण्याचे काम केले. योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्याने महाराष्ट्रात येऊन अनेक सभा घेतल्या. देवेंद्र फडणवीसांचीही (Devendra Fadnavis) शेवटची भाषणे ऐकली, तर ती प्रचंड आक्रमक हिंदुत्वाने भारलेली होती. शेवटच्या टप्प्यात केलेल्या हिंदुत्वाच्या आक्रमक प्रचारानेच वारे फिरवले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महाविकास आघाडीही सत्तेत येण्याची विश्लेषकांनी वर्तवलेली शक्यता ते राज्याला विरोधी पक्षनेताही मिळणार नाही, असे प्रचंड बहुमत, अशा प्रकारे वातावरण बदलले. देवेंद्र फडणवीस या प्रचारानंतर हिंदुत्वाचा शिलेदार म्हणून समोर आले आहेत. हिंदूंची एकगठ्ठा मते महायुतीच्या पारड्यात देऊन हिंदू समाजाने त्याचे कर्तव्य पार पाडले आहे. त्यामुळे या वेळी तरी हिंदूंच्या मतांची जाणीव ठेवून राष्ट्र, धर्म, हिंदुत्व आणि समाज यांसाठी सरकारने भरीव काम करावे आणि हिंदुत्वाचा शिलेदार ही ओळख कायम टिकवावी, अशी समस्त हिंदूंची अपेक्षा आहे !
Join Our WhatsApp Community