-
ऋजुता लुकतुके
नागरी उड्डयण मंत्रालयाने प्रवासी विमानतळाच्या टारमॅकवर बसून जेवण घेतानाचा व्हायरल व्हीडिओची गंभीर दखल घेतली आहे. मुंबई विमानतळ आणि इंडिगो विमान कंपनीला त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागरी उड्डयण मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया यांनी हा प्रकार समोर आल्यानंतर लगेचच मध्यरात्री यावर बैठक बोलावली होती. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘इंडिगो विमान कंपनी आणि मुंबई विमानतळ प्रशासन या दोन्ही संस्थांनी प्रवाशांची काळजी घेण्यात हलगर्जीपणा केला. आणि त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत,’ असा ठपका मंत्रालयाने इंडिगो आणि मुंबई विमानतळावर ठेवला आहे. गोव्याहून दिल्लीला निघालेलं हे विमान आपत्कालीन परिस्थितीत मुंबईत उतरवण्यात आलं होतं. पण, मुंबई विमानतळावर या विमानाला पार्किंग स्टँड उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशांचा विमानतळातील सुविधांशी संपर्क तुटला. आणि जवळ जवळ ८ तास प्रवाशांना स्वच्छतागृह, अन्नपदार्थांचे स्टॉल अशा मूलभूत सुविधाही मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे काही प्रवाशी टारमॅकवर बसून जेवतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
(हेही वाचा – Indian Basmati Rice : जगात भारी भारतीय बासमती; जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत पहिला क्रमांक)
Hope the hapless passengers are not charged additional service charges for unique location dining experience by @IndiGo6E https://t.co/hur7TAdWN5
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) January 15, 2024
परिस्थिती आणि जाणारा वेळ ओळखून या सोयी विमान कंपनी आणि विमानतळ प्रशासनाने करायला हव्या होत्या, असं नागरी उड्डयण मंत्रालयाचं म्हणणं आहे. इंडिगो कंपनीने प्रवाशांची काळजी घेण्यात तर कुचराई केलीच शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्रवाशांना एकदा विमानातून उतरवून पुन्हा कुठल्याही सुरक्षा चाचणीशिवाय त्यांना पुन्हा विमानात बसवण्यात आलं. हे कायदेशीररित्याही अयोग्य आहे. त्यामुळे सिद्ध झालं तर कंपनीवर मोठी कारवाई होऊ शकते.
इंडिगो कंपनीनेही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करायचं ठरवलं आहे. १४ जानेवारीच्या संध्याकाळी हे विमान गोव्याहून दिल्लीला चाललं होतं. पण, विमान सुटायला झालेल्या विलंबामुळे चिडलेल्या एका प्रवाशाने विमानात पायलटला मारहाण केली. आणि त्यामुळे विमान मुंबईत थांबवण्यात आलं आणि त्या प्रवाशाला पोलिसांकडे सोपवण्याची कारवाई करण्यात आली. त्या प्रक्रियेला वेळ लागल्यामुळे ते विमानही मुंबई विमानतळावर ८ तास थांबून राहिलं होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community