ठाण्यातील कोपरी परिसरातून एक दुदैवी घटना उघडकीस आली आहे. वाहतूक पोलिसांच्या ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’च्या कारवाईमुळे करिअर धोक्यात आल्यामुळे अस्वस्थ झालेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणाने आपल्या आईच्या मोबाईलवर केलेल्या मेसेजमध्ये आत्महत्येला सर्वस्वी वाहतूक पोलिसांना जबाबदार ठरवले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्याने केली आहे.
मनीष उतेकर असे या तरुणाचे नाव आहे. ठाण्यातील कोपरी परिसरात राहणारा मनीष उतेकर याला कोपरी वाहतूक पोलिसांनी गटारी अमावस्येच्या रात्री मद्यप्राशन करून दुचाकी चालवताना पकडले होते. सैन्य दल आणि पोलीस दलात भरतीची तयारी करणाऱ्या मनीषवर वाहतूक पोलिसांनी ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ ची कारवाई केली. त्यावेळी तो घाबरला, या कारवाईमुळे करिअर संपेल या भीतीपोटी त्याने वाहतूक पोलीस शिपायाकडे गयावया केली. हवं तर तुम्ही जागेवर दंड करा, मात्र कोर्टात जाण्यास सांगू नका म्हणून मनीष विनंती करीत होता. वाहतूक पोलिसांनी त्याला जे काही सांगायचे कोर्टात सांग असे सांगितले. या कारवाई नंतर दोन ते तीन दिवस मनीष हा तणावात होता. त्यातून त्याने शुक्रवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.
भावाच्या आत्महत्येमुळे दु:खी झालेल्या कुटुंबीयांनी आपल्या मृत भावाला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याचना केल्या आहे की, याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा. दुसरीकडे, ठाण्याचे वाहतूक डीसीपी विनय राठोड यांनी या प्रकरणाबाबतची संपूर्ण कारवाई योग्य ठरवत ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणाच्या सादरीकरणासाठी न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी पोलिसांनी मनीषचे पाऊल चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आईच्या मोबाईल फोनवर मेसेज केला होता हा मेसेज आणि मनीष याचा फोटो समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.
(हेही वाचा – Rahul Kul : भीमा-पाटस प्रकरणात राहुल कुल यांना क्लीन चिट; संजय राऊतांनी केले होते आरोप)
मनीषने काय लिहले होते मेसेज मध्ये…
“मी मनिष उतेकर. गटारीच्या दिवशी माझी गाडी कोपरी ठाणे ईस्ट या भागात ट्राफिक पोलीस मोरे साहेब यांनी रात्रीच्या वेळी ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये पकडली. मी आर्मी भरती पोलीस भरती देणारा विद्यार्थी आहे. गाडी पकडली त्यात त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही उद्या या, आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा गेलो माफी मागितली आणि जे काय असेल ते दंड तिथेच भरायला तयार होतो. पण, त्यांनी मला धमकी देऊन सांगितलं कोर्टात जावं लागेल. माझ्या समोर कित्येक बाईक लाच घेऊन पैसे घेऊन सोडून दिले त्यांनी. मी परत तिसऱ्या दिवशी गेलो माफी मागितली. सांगितलं साहेब माझं करिअर सर्व संपून जाईल कोर्टात गेलो तर तुम्ही दंड काय असेल ते घ्या मी देतो इथेच. ट्राफिक पोलीस पुष्पक साहेब, ट्राफिक पोलीस सुधाकर साहेब यांनी मला धमकी दिली. तुझं करिअरच बरबाद करायचं आहे भीती दाखवून दिली या सर्व भीती मुळे आज मी आत्महत्या करत आहे. आज ही माझ्यावर वेळ आले उद्या अशी वेळ कोणावर यायला नको, मी सर्व ट्राफिक पोलिसांचा मान ठेवतो पण अस कधी कोणासोबत वागू नका जेणेकरून समोरचा माणूस प्रेशरमध्ये येऊन आत्महत्या करेल म्हणून मी हे सर्व मेसेज करून ठेवत आहे आणि ती गाडी माझ्या मित्राची आहे त्यांची काही चुकी नाही बस ट्राफिक पोलीस सुधाकर साहेब, ट्राफिक पोलीस पुष्कर साहेब यांच्या दबावामुळे मी आज आत्महत्या करत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community