संपूर्ण राज्यासह मुंबईमध्ये सध्या जोरदार पाऊस पडला असून, मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मुंबईमध्ये अवघ्या ५ तासांमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचले असून, झाडे देखील रस्तावर पडली आहेत. यामुळे मुंबईच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे.
- पालिकेला सतर्क राहण्याच्या सुचना
दरम्यान कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून, आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे.
त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे,आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होत आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास त्यांनी सांगितले आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी पावसामुळे वित्तहानी झाली असली तरी या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मुंबईतल्या अनेक ठिकाणी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दक्षिण मुंबईतील भायखळा, मरीन लाइन्ससह अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमलाही पावसाचा फटका बसला आहे.