केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेचे सदाशिव लोखंडे शिर्डीचे विद्यमान खासदार आहेत. पुन्हा तिकीट मिळवण्यासह आपली खासदारकी संरक्षित करण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपा युतीला पाठिंबा दिला. मात्र, युतीचा घटकपक्ष असलेल्या ‘आरपीआय’कडून आता शिर्डी मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्याने लोखंडे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.
२००९ मध्ये रामदास आठवले यांनी शिर्डीमधून लोकसभा लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला असला, तरी तब्बल ३४ टक्के मते त्यांच्या पारड्यात पडली होती. त्यानंतर आघाडीशी फारकत घेत ते भाजपात दाखल झाले आणि सलग दोन टर्म राज्यसभेच्या खासदारकीसह केंद्रीय मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. २०२६ मध्ये त्यांची खासदारकीची टर्म संपुष्टात येणार आहे. मात्र, यावेळी राज्यसभेऐवजी प्रत्यक्ष लोकांमधून निवडून येत पक्षाला ताकद देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सदाशिव लोखंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. आठवले शिर्डीमधून लढले, तर मी काय करू, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर तुम्ही निश्चिन्त रहा, आपण योग्य तोडगा काढू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिल्याचे कळते. मात्र, त्यावर त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. मातोश्रीसोबत सलगी साधण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
(हेही वाचा – Best Strike : सलग आठ दिवसांनंतर अखेर बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला)
ठाकरे गटात काय चाललंय?
- महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने भाजपाच्या एका नेत्याला गळाला लावले आहे. भाऊसाहेब वाकचौरे असे या नेत्याचे नाव असून, त्यांनी २००९ मध्ये काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांना पराभूत केले होते.
- मूळचे अकोले तालुक्यातील असलेल्या वाकचौरे यांनी नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अधिकारी, त्यानंतर शिर्डी संस्थानचे मुख्य प्रशासकीय अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले होते.
- शिवसेना, काँग्रेस, भाजपा, असा त्यांचा पक्ष बदलाचा इतिहास आहे. येत्या काळात ते पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community