नागपूर येथील कळमेश्वर तालुक्यातील बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला विषारी साप चावला. चेतन कांबळे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला मण्यार जातीच्या जहाल विषारी सापाने दंश केला होता.
चेतन कांबळे नागपूर येथील पिलकेपार गावात राहतो. त्याला पहाटेच्या सुमारास झोपेत असताना उजव्या पायाच्या बोटाला काहीतरी चावल्याचा भास झाला. चावलेल्या जागी असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्याची झोप उडाली. त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याच्या समोर तीन फूट लांबीचा साप होता. त्याने त्वरित सापाचा फोटो घेतला आणि साप चावल्याची माहिती गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्यांना दिली.
(हेही वाचा – World Wrestling Championship : बजरंग आणि दीपक पुनियाला निवड चाचणी स्पर्धा न खेळण्याची मुभा)
प्राणीसंग्रहालयाचे संचालक शतानिक भागवत, प्राणी जीवशास्त्रज्ञ शुभम छापेकर, पशुधन पर्यवेक्षक स्वप्निल बोधाने आणि कर्मचारी सचिन टेकाडे यांना चेतनने सापाचा फोटो व्हाट्सअॅपवर पाठवला. प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी दंश केलेला साप मण्यार जातीचा जहाल विषारी असल्याचे चेतनला कळवले. त्यानंतर चेतनला मोहपा येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील अत्यावश्यक उपचारासाठी त्याला नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलवले.येथे त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचारामुळे चेतनच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सर्पदंश कसे टाळता येतील?
– घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा
– घराजवळील फ़ांद्या आणि भिंतीवरील भेगा बुजवून टाका
– जंगल परिसराजवळ राहत असल्यास अंधारात घराबाहेर जाताना बेटरीचा वापर करा
– जंगल परिसरात फिरताना पायात कायम बूट घाला
– तलाव, नदी, अडगळीची जागा, दगड-विटांचा ढिगाऱ्यातून जाताना बेटरी आणि काठी सोबत ठेवा
– शेतातून किंवा जंगलातून जाताना पायवाटेचा वापर करा
– मोठ्या वाढलेल्या गवतातून जाणे टाळा
– समुद्रकिनारी चौपाट्यावर फिरताना बरेचदा समुद्रसर्प निपचित पडलेले दिसतात. समुद्रसर्प मेलेले आहेत असे समजून त्यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका
– घरातील आणि परिसरातील कचऱ्याची योग्य रितीने विल्हेवाट लावा
सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार
– जखम स्वच्छ पाण्याने किंवा डेटॉलच्या पाण्याने धुवावी
– सर्पदंश झालेल्या हाडावर क्रेप बेंडेज किंवा आवळपट्टी बांधून दर दहा मिनिटांनी पाच ते दहा सेकंद सैल सोडावी.
– रुग्णाला चहा, कॉफी, दूध इतर पेय किंवा खाद्यपदार्थ खायला देऊ नका
– सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चालत किंवा धावत रुग्णालयात नेऊ नका.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community