अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाला वेगवेगळे फाटे फुटत असतानाच आता भाजपा कार्यालयातील ५३ वेळा वाजणाऱ्या फोनची चर्चा रंगू लागली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला त्याचा मित्र संदीप सिंह याने भाजपा कार्यालयात एक दोन वेळा नव्हे तर तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती समोर आली. याबाबत भाजपाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी भाजपा कार्यालयातील फोनवरून आता राज्यातील राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे. १ डिसेंबर ते २३ डिसेंबर या काळात भाजपच्या कार्यालयात तब्बल ५३ वेळा संदीपने फोन केल्याचे समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्त वाहिनीने या संबधीची बातमी आज प्रसारित केली आहे.
संदीपचा संजय निरूपम यांनाही फोन
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याच संदीप सिंहने काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांना देखील फोन केल्याची माहिती समोर येत आहे. संदीप सिंह याने सुशांतच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेते संजय निरूपम यांना ३ वेळा फोन केल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपा कार्यालयातील तो ‘बॉस’ कोण?
संदीप सिंह ने भाजपा कार्यालयामध्ये फोन केल्याचे वृत्त प्रसारित होताच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर जोरदार टीका केली असून, संदीपने भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन केला ही माहिती खरी असल्यास भाजपा कार्यालयातील तो बॉस कोण आणि भाजपाची संदीप सिंहशी एवढी जवळीक कशी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणी ड्रग कनेक्शनसंदर्भात संदीप सिंह चौकशीच्या रडारवर असताना तो लंडनला पळून जाऊ शकतो असे मीडिया रिपोर्ट येत आहेत. ड्रग डिलींगशी संदीप सिंहचे नाव जोडले गेल्याने भाजपाशी त्याचे असलेले घनिष्ठ संबंध पाहता ड्रग माफियांशी भारतीय जनता पक्षाचा काही संबंध आहे का? याची चौकशी झाली पाहिजे. यात सत्य समोर आल्यास भाजपाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही. संदीप सिंहने १ सप्टेंबर ते २३ डिसेंबर २०१९ या काळात महाराष्ट्र भाजपाच्या कार्यालयात ५३ वेळा फोन केले. तो भाजपा कार्यालयात कोणाशी बोलत होता? भाजपामधील संदिप सिंहचा ‘हँडलर’ कोण आहे ? असा सवाल देखील सचिन सावंत यांनी विचारला आहे.
Join Our WhatsApp Community