मस्जिद बंदरला तुंबणाऱ्या पाण्याची समस्या अजून लांबणीवर : यंदाच्या पावसाळ्यातही मिळणार नाही दिलासा

176
मस्जिद बंदरला तुंबणाऱ्या पाण्याची समस्या अजून लांबणीवर : यंदाच्या पावसाळ्यातही मिळणार नाही दिलासा
मस्जिद बंदरला तुंबणाऱ्या पाण्याची समस्या अजून लांबणीवर : यंदाच्या पावसाळ्यातही मिळणार नाही दिलासा

पी डिमेलो मार्ग आणि यलो गेट प्रवेश मार्गाच्या ठिकाणी तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गाच्या रेल्वे मार्गावर पाणी तुंबून रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने याठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आरसीसी चेंबर बनवून पूर नियंत्रण दरवाजे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या कामाचा सल्ला पुन्हा एकदा चुकल्याने याचे काम वाढले गेले आहे. त्यामुळे यंदा या भागातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायम राहणार असून यासाठी अतिरिक्त दोन पंप बसवण्याचा निर्णय महापालिका पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

महापालिकेच्या बी विभागातील पी डिमेलो रोड आणि यलो गेट प्रवेश मार्ग येथे दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबले जात असून मागील काही वर्षांपासून याठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी १ हजार घनमीटर प्रति तास क्षमतेच्या पंपाची व्यवस्था केली जात होती. परंतु समुद्रात भरतीच्या वेळी पावसाळ्यात पाऊस जास्त पडल्यास अनेकदा मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन परिसरात दोन फूट पाणी साचत होते. त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पी.डि.मेलो रोड आणि यलो गेट प्रवेश मार्ग येथे आर.सी.सी. चेंबरचे बांधकाम व पूर नियंत्रण दरवाजे आणि पंप बसवण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार याचे काम मागील वर्षी मार्च २०२२ नंतर हाती घेतले होते. त्यानुसार आरसीसी चेंबरच्या कामाला सुरुवात झाली. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आरसीसी चेंबरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकले नाही.

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या शिव योग केंद्रातून घेतला १५ हजार लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ)

या चेंबरचे बांधकाम सुरु असताना साचलेले पाणी काढून टाकताना विद्यमान पर्जन्य जलवाहिनींमध्ये पोकळी निर्माण होऊ लागली व अतिशय धोकादायक स्थितीत होते. त्यामुळे कंत्राटदाराने नियुक्त केलेल्या सल्लागार गिरीजा कन्सल्टंट यांनी ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले. उच्च क्षमतेच्या पंपाने जर पावसाचे पाणी जर विद्यमान पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडल्यास त्या पर्जन्य जलवाहिनी ढासळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी १५०० मि मी व्यासाची पोलादी वाहिनी ही चेंबरपासून ते पातमुखापर्यंत टाकण्याची शिफारस केली आहे. तसेच उपलब्ध असलेल्या तीन पंपाची क्षमता ही पाण्याची निचरा करण्यासाठी येणाऱ्या पावसाळ्यात कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सल्लागाराने दोन अतिरिक्त पंपांचा पुरवठा करण्याचीही शिफारस केली आहे.

त्यानुसार यलो गेट प्रवेशद्वार येथील आरसीसी चेंबरपासून ते ओएनजीसी पातमुखापर्यंत जवळपास ७०० मीटर एवढ्या लांबीची १५०० मिली मीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी टाकली जाणार आहे. तसेच ३००० घनमीटर प्रति तास क्षमतेचे दोन पंप यलो गेट येथील आरसीसी चेंबर येथे तीन वर्षांसाठी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त कामांसाठी १५०० मि मी व्यासाची पर्जन्य जलवाहिनीकरता ११ कोटी ३१ लाख रुपये आणि ३००० घन मीटर क्षमतेचे २ पंपांचा पुरवठा करून तीन वर्षांसाठी देखभाल करण्यासाठी ५ कोटी ७५ लाख रुपये अशाप्रकारे एकूण १७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यासाठी कामासाठी साज एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कामे झाल्यानंतर पी डिमेल्लो मार्ग व मस्जीद बंदर रेल्वे स्थानक परिसर येथे पावसाळ्यात निर्माण होणारी पूर परिस्थिती आटोक्यात येऊन त्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल असे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.