A History Day : ॲथलेटिक्स विश्वविजेतेपदाच्या भालाफेक प्रकारात एकाच वेळी तीन भारतीय अंतिम फेरीत

SUMMARY : A History Day : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत शुक्रवार (२५ ऑगस्ट)चा दिवस कायम स्मरणात राहील असा ठरलाय. या दिवशी भालाफेक प्रकारात एकाच वेळी तीन भारतीय अंतिम फेरीत दाखल झाले. ॲथलेटिक्समध्ये ही घटना पहिल्यांदाच घडलीय.

200
A History Day : ॲथलेटिक्स विश्वविजेतेपदाच्या भालाफेक प्रकारात एकाच वेळी तीन भारतीय अंतिम फेरीत
A History Day : ॲथलेटिक्स विश्वविजेतेपदाच्या भालाफेक प्रकारात एकाच वेळी तीन भारतीय अंतिम फेरीत

ऋजुता लुकतुके

ॲथलेटिक्स आणि त्यातही भालाफेक प्रकारात २५ ऑगस्ट हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरलाय. या दिवशी नीरज चोप्रासह डी पी मनू आणि किशोर जेना हे तिघे भारतीय भालाफेकीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. ॲथलेटिक्समध्ये आशियाई किंवा त्यावरील स्तरावर अशी कामगिरी भारतीय ॲथलीटनी पहिल्यांदा केली आहे.

‘भारतासाठी असं पहिल्यांदा घडतंय. एकाच प्रकारात तिघे भारतीय अंतिम फेरीत खेळणार आहेत. असं पूर्वी घडलेलं नाही,’ भारतीय संघातील एका प्रशिक्षकांनी पीटीआयशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

(हेही वाचा – Asian Games 2023 : ६३४ जणांचा भारतीय संघ जाहीर, बजरंग पुनियाचा समावेश)

अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला भालाफेकपटू होता नीरज चोप्रा. त्याने पहिलीच फेक ८८.७७ मीटरवर करून अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केलाच. शिवाय पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी असलेला ८५.५० मीटरचा निकषही त्याने आरामात पार केला. खरंतर स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला पाचदा भालाफेक करता येते. पण, नीरजने पहिल्या तगड्‌या फेकीनंतर उर्वरित चार संधी न वापरण्याचा निर्णय घेतला.

यानंतर डी पी मनूने पाच प्रयत्नांमध्ये ८१.३१ मीटरची सर्वोत्तम फेक नोंदवली. यामुळे पात्रता फेरीत त्याचा क्रमांक तिसरा होता. तर सर्वसाधापणपणे या स्पर्धेत त्याची फेक सहाव्या क्रमांकावर आहे. तर किशोर जेना आपल्या गटात पाचवा आला. आणि सर्व खेळाडूंमध्ये तो नववा होता. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदार्पण करताना किशोरने ८०.५० मीटरची सर्वोत्तम फेक नोंदवली.

आपल्या कामगिरीनंतर क्रीडा प्राधिकरणाच्या मीडिया चमूशी बोलताना नीरजने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मी माझ्या ९० टक्के क्षमतेनंच खेळलो आहे. भाला फेकताना एकदम नेहमीसारखं वाटलं. आता विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे रविवारच्या अंतिम फेरीत मी नक्कीच पूर्ण तयारीनिशी उतरेन,’ असं नीरज म्हणाला.

दोन वर्षांपूर्वी नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी ॲथलेटिक्स प्रकारातील पहिलं सुवर्ण जिंकलं होतं. त्यानंतर ॲथलेटिक्समध्येही भारतीय संघाची कामगिरी दिवसेंदिवस सुधारत आहे. आता एकाच प्रकारात तीन जण अंतिम फेरीत पोहोचणं ही त्याचीच परिणती आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.